ढवळपाटी येथे युवकाचा खून; प्रेमप्रकरणातून मारहाण, चार जणांवर गुन्हा
फलटण, (गंधवार्ता वृतसेवा) दि. १० – फलटण तालुक्यातील ढवळपाटी (वाखरी) परिसरात १८ वर्षीय युवकाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत युवकाचे नाव सोमनाथ संदीप जाधव (वय १८, रा. मिरचीवाडी – दालवडी, ता. फलटण) असे असून, त्याचे वडील संदीप उमाजी जाधव (वय ४२) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १० एप्रिल रोजी पहाटे सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सोमनाथ हा नरसिंग शिंदे यांच्या मुलीशी मोबाईलवर चॅटिंग करत असल्याच्या रागातून आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डांबरी रस्त्यावर आपटल्याने त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आदित्य विजय शिंदे, ओम लोखंडे, चिक्या लोखंडे व पिंटू लोखंडे (सर्व रा. ढवळ, ता. फलटण) यांच्याविरुद्ध बीएनएस कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक १९०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments