Breaking News

फलटण बसस्थानकावर ‘बोकडवाडी’ची एसटी; चुकीच्या फलकामुळे प्रशासनावर संताप

‘Bokadwadi’ ST Bus at Phaltan Bus Stand; Outrage Against Administration Over Incorrect Signboard

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.९ एप्रिल - फलटण तालुक्यातील बोडकेवाडी गावाचे नाव चुकीचे दर्शवून ‘बोकडवाडी’ असा फलक लावल्याने ग्रामस्थ व प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित फलक बसस्थानकावर उभ्या असलेल्या एमएच १४ बीटी २८३४ या बसवर लावण्यात आला होता.

    दि.८ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली. बसवर ‘फलटण ते बोकडवाडी’ असा चुकीचा बोर्ड लावलेला असताना स्थानकावरील अधिकारी, कंट्रोलर तसेच चालक-वाहक यांची ये-जा सुरू होती, मात्र कुणीही याकडे लक्ष दिले नाही. यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

    "बोडकेवाडी" गावाचा चुकीचा उद्धार करीत "बोकडवाडी" असे चुकीचे नामकरण केल्याने ज्या स्पॉन्सरने तो बोर्ड दिला, त्याचा व बसस्थानक प्रमुखांच्या या निष्काळजीपणाचा प्रवाशांनी निषेध नोंदवला आहे.
      फलटण येथील बसस्थानक म्हणजे असून अडचण अन् नसून खोळंबा अशी अवस्था व तेथील अधिकाऱ्यांचा उद्दामपणाचा अनेकांना कटू अनुभव आला आहे.  कोट्यवधी रुपयांची कमाई (अर्निंग) केल्याचा तसेच सातारा जिल्ह्यात आम्हीच एक नंबर असा गवगवा करणारे अधिकारी अन् फलटण बस स्थानकावर सतत फुकटचे सल्ले देणारे दिवसभर फिरत असतात. हे सल्लागार व अधिकारी साधे विभाग नियंत्रकांकडून बोर्ड मागवत नाहीत, ते नेहमी शहरातील व्यापाऱ्यांना त्यांच्या जाहिराती लाऊन स्पॉन्सरशीपने बोर्ड मागवत असतात. फलटण आगारातील बसेसेसाठी हे अधिकारी किंवा फुकटे सल्लागार कधीच स्वतःच्या खिशातून एक रुपया खर्च करीत नाहीत,अन् भिका मागून आणलेले बोर्ड असे गावाची बदनामी करतात, त्यामुळे संबंधित एस टी चे अधिकारी किंवा बोर्ड दिलेला व्यापारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी बोडकेवाडी ग्रामस्थ तसेच प्रवाशांनी केली आहे.

No comments