Breaking News

फलटण शहर पोलिसांची बकरी ईद पार्श्वभूमीवर संयुक्त शांतता बैठक संपन्न

Phaltan City Police holds joint peace meeting on the occasion of Bakri Eid

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ मे - आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी फलटण शहर पोलीस ठाण्यात आज दि. २५ मे २०२६ रोजी संयुक्त शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    या बैठकीस  उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, तहसीलदार अभिजीत जाधव तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे उपस्थित होते. बैठकीत शांतता कमिटी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, मोहल्ला कमिटी सदस्य, पत्रकार, गोरक्षक तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील कत्तलखाना चालक उपस्थित होते.

    बैठकीत उपस्थितांची मते जाणून घेण्यात आली. बकरी ईद निमित्त कत्तलखाने सुरू करण्यासाठी नगरपालिकेकडून तात्पुरता परवाना घेणे बंधनकारक असल्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच गाय, वासरू अथवा खोंड यांची कोणत्याही परिस्थितीत कत्तल केली जाणार नाही, याबाबत स्पष्ट सूचना कत्तलखाना धारकांना देण्यात आल्या.

    कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य आढळल्यास नवीन शासन परिपत्रकानुसार अवैध कत्तल करणाऱ्या व्यक्ती अथवा टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला. तसेच संबंधितांना BNSS कलम १६८ प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिली. सध्या संपूर्ण परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments