गजानन चौकातील वृक्षांच्या संरक्षणासाठी फलटणमध्ये स्वाक्षरी मोहीम
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ : फलटण शहरातील गजानन चौक ते महात्मा फुले चौक परिसरातील हेरिटेज वृक्षांचे संवर्धन, जतन आणि संरक्षण व्हावे या उद्देशाने नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी यांच्या वतीने विशेष “स्वाक्षरी मोहीम” आयोजित करण्यात आली आहे.
ही स्वाक्षरी मोहीम उद्या दि. २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ४.०० ते ७.०० या वेळेत गजानन चौक, फलटण येथे राबविण्यात येणार आहे. शहरातील ऐतिहासिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या वृक्षांचे संरक्षण व्हावे, त्यांची अनावश्यक तोड थांबावी आणि नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमात सर्व निसर्गप्रेमी, प्राणी प्रेमी, पर्यावरण कार्यकर्ते तसेच जागरूक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments