Breaking News

समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई ; शांतता राखण्याचे डीवायएसपी विशाल खांबे यांचे आवाहन

Strict action against those who create division in the society; DySP Vishal Khambe appeals to maintain peace

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ मे २०२६ -  छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी भावना दुखावणारी घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर फलटण शहरात तीव्र पडसाद उमटले असून, या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, तसेच “जाणूनबुजून दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे,” असे आवाहन शांतता  कमिटीच्या मीटिंगमध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी दिली.

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी भावना दुखावणारी घटना घडल्याचा पार्श्वभूमीवर फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी आज आपल्या दालनात फलटण शहरातील पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच शांतता समिती सदस्यांची बैठक आयोजित केली होती.

    काल संबंधित ऑडिओ क्लिप व पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यानंतर नागरिकांनी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली व तत्काळ गुन्हा दाखल केल्याचे डीवायएसपी खांबे यांनी सांगितले.

    दरम्यान डीवायएसपी खांबे यांनी उपस्थितांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

No comments