फलटण शहरातील पॅचवर्कवर नागरिकांचा संताप; निकृष्ट कामाबाबत नगरपरिषदेला तक्रार
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि १८ : शहरात महापुरुषांच्या जयंतीपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्यांच्या पॅचवर्क कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात कसबापेठ येथील रहिवासी प्रीतसिंह अमरसिंह खानविलकर यांनी फलटण नगरपरिषदेकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित पॅचवर्क काम वर्क ऑर्डरनुसार दर्जेदार साहित्य वापरून होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात माती व मिक्स मुरूम टाकून केवळ दिखाव्यासाठी काम उरकण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, काही दिवसांतच रस्त्यांची अवस्था पुन्हा खराब होऊ लागली असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
या प्रकरणी तात्काळ चौकशी करून कामाची गुणवत्ता तपासावी, काम वर्क ऑर्डरप्रमाणे झाले आहे का याची खातरजमा करावी, तसेच निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अर्जदारांनी केली आहे. याशिवाय संबंधित रस्त्यांचे काम योग्य दर्जात पुन्हा करून घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरात अशा प्रकारे निकृष्ट कामे होत असल्यास प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, याबाबत फलटण नगरपरिषद काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments