Breaking News

सातारा जिल्हा नाभिक महामंडळ अध्यक्षपदी अंबादास दळवी यांची बिनविरोध निवड

Ambadas Dalvi elected unopposed as the President of Satara District Nucleus Corporation

   (फलटण गंधवार्ता वृतसेवा) -  दि १३ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी अंबादास तुकाराम दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. लोणंद येथे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील नाभिक महामंडळाच्या कार्यकर्ता मेळावा व विशेष सभेत ही निवड जाहीर करण्यात आली.

    या कार्यक्रमास राज्याध्यक्ष कल्याणराव दळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश राऊत, विठ्ठल गायकवाड, शंकरराव मर्दाने, शंकर भाऊ दळवी, संतोष साळुंखे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यात नाभिक समाजासाठी शासनाच्या विविध योजना, अल्पदरात कर्जपुरवठा, मुला-मुलींना शासकीय सवलती आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    नाभिक समाजाच्या अडीअडचणी शासनदरबारी प्रभावीपणे मांडणारा व समाजकार्याशी नाळ जुळलेला युवा नेतृत्व आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. फलटण तालुक्यात समाजसेवेबरोबरच नाभिक समाजाचे मेळावे आयोजित करून गरजूंपर्यंत मदत पोहोचवणे, तसेच संत सेना महाराज, शिवा काशिद, जिवा महाले यांच्या जयंती एकत्रितपणे साजऱ्या करण्यातील योगदान लक्षात घेऊन अंबादास दळवी यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. त्यानुसार त्यांची सातारा जिल्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

    या मेळाव्यास कराड, महाबळेश्वर, वाई, सातारा, कोरेगाव, म्हसवड, माण, वडूज, फलटण व लोणंद येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    दरम्यान, या निवडीबद्दल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर तसेच माजी आमदार दीपकराव चव्हाण यांच्यासह सामाजिक, राजकीय व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अंबादास दळवी यांचे अभिनंदन केले.

No comments