महात्मा जोतिबा फुले यांच्या मुळे आज बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग
फलटण (गंधवार्ता वृतसेवा)- महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले हे १९ व्या शतकातील महान समाजसुधारक,विचारक आणि क्रांतिकारक होते. ११ एप्रिल १८२७ रोजी पुण्यात जन्मलेले फुले यांनी समाजातील विषमता,अंधश्रद्धा आणि अन्याय दूर करण्यासाठी आयुष्य वेचले असे मत विडणी चे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी सांगितले.
फलटण येथे थोर विचारवंत महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन करताना सागर अभंग बोलत होते, यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास कल्याण सभापती सौ. लताताई कर्णे तसेच विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे,भाजपा युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय अभंग उपस्थित होते.
समाजसेवा काय असते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे महात्मा जोतिबा फुले होय त्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविली. त्या काळात अत्यंत कठीण असे कार्य त्यांनी पार पाडले यामुळे आज बहुजनांची मुले डॉक्टर, उच्च पदस्थ अधिकारी,त्याच बरोबर मोठमोठे उद्योजक बनले असून आजच्या काळात शिक्षण हेच अनमोल ठरत आहे असे सागर अभंग यांनी स्पष्ट केले.

No comments