Breaking News

फलटण पंचायत समितीचे सभापती पद भाजपकडे ; सभापतीपदी भाजपच्या शिवांजली भोसले तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल सस्ते

BJP wins Phaltan Panchayat Samiti chairman post; BJP's Shivanjali Bhosale as chairman and Shiv Sena's Amol Saste as deputy chairman

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ मार्च २०२६ - फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या शिवांजली विक्रम भोसले यांची तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल सस्ते यांची बिनविरोध निवड झाली. भाजपने तीस वर्षानंतर सत्तांतर घडवत प्रथमच पंचायत समितीवर सभापती पदाचा झेंडा फडकविला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे हा ट्विस्ट पाहायला मिळाला.

    फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीत एकूण १६ जागांपैकी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रवादी युतीला ८ तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला ८ जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे सभापती उपसभापती निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता. दोन्ही गटाचे प्रत्येकी आठ सदस्य निवडून आल्यामुळे महिनाभर सर्व सदस्य सहलीला गेले होते. आज ते थेट सभागृहात दाखल झाले.

    निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सौं प्रियांका आंबेकर यांनी सभापती उपसभापती निवड प्रक्रियेची माहिती दिली. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत सभापती पदासाठी शिवांजली भोसले यांचा तर उपसभापतीसाठी अमोल सस्ते यांचा अर्ज आल्याने, निवडी बिनविरोध झाल्या.

    आज निवडणुकीपुर्वी सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीपसिंह भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी शिवसेनेचे नेते व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्याची चर्चा आहे, या भेटीमध्ये सभापती भाजप राष्ट्रवादी युतीचा तर उपसभापती शिवसेनेचा असा निर्णय घेण्यात आला. सकाळी 11 नंतर सहलीला गेलेले सर्व सदस्य एकत्र पंचायत समिती सभागृहात आले. यावेळी पंचायत समितीच्या बाहेर दोन्ही पक्षाचे नेते मंडळी ठिय्या देऊन बसले होते, त्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील,माजी आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर , ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर आदी उपस्थित होते. 

    आज सकाळी मोठ्या नाटकीय घडामोडी घडल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवांजली विक्रम भोसले यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. 

    निवडीनंतर सभापती शिवांजली भोसले यांचा सत्कार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या निवडीबद्दल आनंद व्यक्त करून पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात यापुढे विकास कामे होतील जनतेच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू राजकारण बाजूला ठेवून सर्व सदस्यांना सामान्य दिला जाईल व त्या पद्धतीने विकास कामे केली जाते अशी ग्वाही यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

No comments