हल्ला प्रकरणात व्यापारी आक्रमक ; आरोपींची धिंड काढा - व्यापाऱ्यांची मागणी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२५ - शंकर मार्केट फलटण येथे अनिल हिरणवाळे या व्यापाऱ्यास करण्यात आलेली मारहाण तसेच रविवार पेठेतील हिंदुस्तान हार्डवेअरचे मालक पटेल यांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज फलटण शहरातील व्यापाऱ्यांनी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन, सदर गुन्ह्यातील आरोपींची धिंड काढण्यात यावी व आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावर फलटण शहर पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी फलटणच्या बाजारपेठेतून वरचेवर पेट्रोलिंग करण्यात येईल तसेच या प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
फलटण शहर व परिसरात वाढत चाललेले चोरी, मारहाण, रोड रोमिओ यांच्यापासून फलटण शहरातील व्यापारी व नागरिकांनी होणाऱ्या त्रासाचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी आज फलटण शहरातील फलटण व्यापारी संघटनेच्या वतीने फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, फलटण शहर परिसर या भागांमध्ये सध्या चोरी जबरी गुन्हे तसेच भयंकर प्रकार निदर्शनास येत आहेत, अशा घटनांना आपण कायमस्वरूपी बंदोबस्त करणे आवश्यक होते, गस्त वेळीच रोडवर आटकाव करणे या गोष्टी अपेक्षित होत्या, परंतु तसे निदर्शनात दिसून आले नाही. व्यापारी हा संकलित कर, इन्कम टॅक्स यासारखे सर्व कर भरत असतो, त्यांना संरक्षण देणे हे आपले प्राथमिक नैतिकता आहे आणि यामध्ये वारंवार आपल्याला पूर्वीही निवेदने देण्यात आलेली आहेत.परंतु मागील सलग दोन दिवस घडलेले व्यापाऱ्यावरील हल्ले यामुळे व्यापाऱ्यांमध्ये व फलटणमधील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, आपण वेळीच या सर्व गोष्टींना आवर घालून व्यापाऱ्यांना व नागरिकांना भयमुक्त फलटण व सक्षम पोलीस दल आहे याची लवकरात लवकर जाणीव करून द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे फलटण व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments