विकास हाच शिवसेनेचा अजेंडा, ‘लाडकी बहीण’ योजना कोणत्याही अफवांमुळे बंद होणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.५ : फलटण तालुक्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. माझ्या लाडक्या बहिणींवर होणारा अन्याय व अत्याचार कधीही सहन केला जाणार नाही. कोणीही दादागिरी अथवा गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची दादागिरी जनता फोडून काढेल, असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
साखरवाडी (ता. फलटण) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते व्हीसीद्वारे बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रामराजे नाईक निंबाळकर व त्यांची संपूर्ण टीम शिवसेनेसोबत ठामपणे उभी राहिल्याने फलटण तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सातारा जिल्हा ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून जिल्हा परिषदवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटण दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
माझ्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत रखडलेले प्रकल्प मार्गी लावून विकासकामांना गती दिली. विकास हाच शिवसेनेचा अजेंडा आहे. ‘लाडकी बहीण’ योजना कोणत्याही अफवांमुळे बंद होणार नाही. बहिणी-भावांना स्वावलंबी करण्यासाठी रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कृष्णा खोरे विकास महामंडळ, नीरा-देवघर प्रकल्प तसेच जलसंधारणाच्या कामांमुळे फलटण, खंडाळा व माळशिरस भागात शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीबाबत सुरू असलेल्या अफवांचा समाचार घेतला. साताऱ्यात २७७ हेक्टरवर एमआयडीसीचे नोटिफिकेशन झाले असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पारदर्शक प्रक्रियेत योग्य मोबदला दिला जाईल. पुढील महिन्यात रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, सध्या मी तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीत असलो तरी महायुतीचे काम करत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी होतील. शेवटचे दोन दिवस कार्यकर्त्यांनी कसोशीने प्रयत्न करावेत, विजय आपलाच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेला उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला असून येणाऱ्या निवडणुकांत शिवसेनेला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

No comments