Breaking News

फलटणला स्वतंत्र जिल्हा करण्यासाठी प्रयत्नशील - रणजितसिंह नाईक निंबाळकर

Efforts are being made to make Phaltan a separate district - Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.५  : महायुतीच्या माध्यमातून फलटण तालुक्यात पालखी महामार्गासह रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सुविधा यांना प्राधान्य देण्यात आले असून शहरातील प्रशासकीय कार्यालये व इमारती पूर्णत्वास नेण्यात आल्या आहेत. मुंबई–अहमदाबाद ही देशातील दुसरी बुलेट ट्रेन फलटणहून जाणार असून शिंदेनगर येथे तिचे स्टेशन होणार आहे. तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय फलटणला आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फलटणला स्वतंत्र जिल्हा करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असे स्पष्ट मत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

    गुणवरे (ता. फलटण) येथे महायुतीचे गुणवरे गटाच्या उमेदवार ऋतुजा अभिजीत जगताप व गुणवरे गणाच्या उमेदवार वनिता धनाजी आढाव यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर उपस्थित होते.

    रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, माझ्या जमिनीसाठी मी नीरा-देवघर प्रकल्पाचे पाणी सांगोल्याला नेले, असा आरोप विरोधक करत आहेत. त्यांनी माझा सांगोल्यातील सातबारा दाखवावा, मी राजकारण सोडून देईन, असे खुले आव्हान त्यांनी दिले. मात्र नीरा-देवघर व धोम-बलकवडी प्रकल्पातून जवळपास तीन टीएमसी पाणी नीरा उजवा कालव्यात आणले असल्याचा उल्लेख विरोधक करत नाहीत. या वाढीव पाण्याचा थेट फायदा फलटण तालुक्यालाच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    नाईकबोमवाडी येथील एमआयडीसी रद्द व्हावी यासाठी बैठका घेतल्याचा आरोप रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर करत रणजितसिंह यांनी, अशा बैठका घेतल्या नसल्याचे त्यांनी सांगावे, तसेच सांगोल्यातील माझा सातबारा दाखवावा, असे प्रतिआव्हान दिले. या एमआयडीसीमुळे तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे वीस हजार युवकांना रोजगार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    ते पुढे म्हणाले, पालखी महामार्गासह आदर्की, गिरवी, आसू, बारामती रस्ते तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. फलटणला जिल्हा सत्र न्यायालय, आरटीओ कार्यालय, पोलीस स्टेशनच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. रेल्वे सेवा सुरू झाली असून आता पंढरपूर रेल्वेही सुरू होत आहे. केंद्र सरकारने बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाला बजेटमध्ये मंजुरी दिल्याने फलटण ते मुंबई प्रवास अवघ्या ४० मिनिटांत शक्य होणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

    यावेळी तालुक्यातील सहकारी संस्थांबाबत बोलताना रणजितसिंह यांनी श्रीराम कारखाना, दूधसंघ, खरेदी-विक्री संघ व मार्केट कमिटीचे वाटोळे केल्याचा आरोप विरोधकांवर केला. गेल्या विधानसभा व नगरपालिका निवडणुकीप्रमाणेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही जनता त्यांना थारा देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    दरम्यान, शिवरूपराजे खर्डेकर यांनी विरोधकांनी गेल्या ३० वर्षांत केलेल्या विकासावर न बोलता केवळ टीका करण्याचे काम सुरू ठेवले असल्याचे सांगत महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.

No comments