भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, बुद्ध विहार व वाचनालयाचे सुशोभीकरण होणार
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.६ फेब्रुवारी २0२६ - फलटण शहरातील मंगळवार पेठ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, बुद्ध विहार आणि वाचनालयाच्या सुशोभीकरणाचा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागणार आहे. 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती २०२६' च्या वतीने देण्यात आलेल्या मागणीची तातडीने दखल घेत, फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आगामी भीम जयंतीपूर्वी सर्व कामे पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली आहे. या संदर्भात समितीच्या वतीने मुख्याधिकारी निखील जाधव आणि नगराध्यक्षांना सविस्तर निवेदन देण्यात आले होते.
मंगळवार पेठेतील स्मृती भवन आणि शेरी येथील बुद्ध विहाराची स्थिती सुधारण्यासाठी अनेक कामांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सभागृहांचे रंगकाम, बांधकाम ाची डागडुजी, खिडक्यांचे स्लाइडिंग काम आणि नवीन लाईट फिटिंगचा समावेश आहे. तसेच, अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसाठी नवीन फॅन, खुर्ची-टेबल आणि पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर बसवण्याची मागणीही करण्यात आली आहे. पावसाळ्यात होणारी छताची गळती थांबवून भीम जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्मृती भवन आणि बुद्ध विहारास आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात येणार आहे.
याप्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या स्मृती भवनाचे पावित्य राखणे आणि ते सुसज्ज ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. जयंती समितीने सुचवलेली सर्व कामे १४ एप्रिलच्या आधी पूर्ण होतील, असा शब्द मी देतो.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी नगरसेवक सुदामआप्पा मांढरे, सचिन अहिवळे, किरण राऊत, राहुल निंबाळकर यांच्यासह रणजितसिंह भोसले, अमोल सस्ते, संजय गायकवाड आणि जयंती मंडळाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments