अजित पवार यांच्या अस्थींचे साताऱ्यात दर्शन
सातारा दि ३ (प्रतिनिधी ) सातारा जिल्ह्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अस्थीकलशाचे मंगळवारी साताऱ्यात येथील राष्ट्रवादी कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी या अस्थिंचे दर्शन घेतले. हा अस्थीकलश पाहून सातारकरांचे डोळे पाणावले. दुपारनंतर या अस्थी संगममाहुली येथे कृष्णा-वेण्णा नदीच्या संगमामध्ये विसर्जित करण्यात आल्या. तत्पूर्वी कृष्णा वेण्णा संगमावर कैलास स्मशानभूमीत अजित पवारांनी लावलेल्या पिंपळाच्या झाडाला वाहण्यात आल्या.
मूळ सातारकर राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दि. २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या घटनेने महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित पवार आणि सातारकर वेगळे असे भावनिक नाते होते. पुण्यानंतर सातारा जिल्ह्याच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिले. गावोगावी त्यांचा मोठा जनसंपर्क होता. सातारकरांनी त्यांच्याबद्दल मोठी आस्था आणि प्रेम होते. त्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे समजताच सातारा जिल्ह्यातील सामन्य माणूस, शेतकरी, नागरिक, ग्रामस्थ महिला लहान मुले या घटनेने धायमोकलून रडले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वजण स्तब्ध झाले होते. अजूनही या दु:खातून सावरणे अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या लोकांना शक्य झालेले नाही. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या आवारामध्ये अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यावेळी अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो सातारकर बारामतीला गेले होते.
मात्र, अनेकांना बारामतीला जाता आले नव्हते, या लोकांच्या भावनांचा विचार करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अजित पवारांचा अस्थीकलश सातारा येथे आणण्यात आला. आज मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ३.३० यावेळेत हा अस्थींचेकलश दर्शनासाठी कार्यालयात ठेवण्यात आला होता.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, नगराध्यक्ष अमोल मोहिते, राजकुमार पाटील, प्रकाश येवले, सौरभ शिंदे, संदीप चव्हाण, मेघा नलावडे, गोरखनाथ नलावडे, लक्ष्मीताई कळंबे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, राजेंद्र लवंगारे, निशा डाळवाले, गोयेगिता सकुंडे, सुप्रिया बगाडे, सुप्रिया देशमुख, प्रविण निकम, संग्राम लवंगारे, शितल कदम, सीमा जाधव, स्मिता देशमुख, अमित कदम, चंद्रकांत सणस, आशाताई कदम, संजय पाटील, आदींसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी तसेच सामान्य नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात येवून या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. तसेच अजित पवारांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले आणि पुष्पांजली वाहिली.
अजित पवार यांनी स्वतः संगम माहुली येथील श्री बालाजी ट्रस्ट च्या कैलास स्मशानभूमी मध्ये २०२३ साली लावलेल्या पिंपळाच्या झाडाला त्यांच्या अस्थी राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते वाहण्यात आल्या.
या नंतर कृष्णा वेण्णा संगमावर बाळासाहेब सोळसकर, अमित कदम राजेंद्र लवंगारे, राजेंद्र चोरगे यांच्या हस्ते अस्थीविसर्जित करण्यात आल्या.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

No comments