Breaking News

रोहित नागटिळे यांचा विक्रमी विजय ; १,११५ मतांचे मताधिक्य

Rohit Nagtile's record victory; 1,115 votes lead

    फलटण गंधवार्ता वृत्तसेवा दि.२२ - फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले असतानाच, प्रभाग क्रमांक ५ (ब) मधून भाजपचे युवा उमेदवार रोहित राजेंद्र नागटिळे यांनी विक्रमी मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. संपूर्ण नगरपरिषदेत नगरसेवक पदासाठी सर्वाधिक १,८६३ मते मिळवण्याचा मान रोहित नागटिळे यांनी पटकावला असून, त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी विजय हरिभाऊ पाटील यांचा तब्बल १,११५ मतांनी पराभव केला आहे.

    प्रभाग क्रमांक ५ (ब) मधील मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच रोहित नागटिळे यांनी आघाडी घेतली होती. अंतिम निकालात त्यांना १,८६३ मते मिळाली, तर विजय पाटील यांना केवळ ७४८ मते मिळाली. या निवडणुकीतील हे सर्वात मोठे मताधिक्य ठरले असून, नागटिळे यांच्या विजयाची शहरभर चर्चा सुरू आहे.

    दरम्यान, निवडणूक प्रचाराच्या काळात नागरिकांनी रस्त्यांची दुरावस्था, पाण्याची तीव्र गैरसोय, सांडपाणी निचऱ्याचा अपुरा वेग तसेच गटार व्यवस्थेतील त्रुटी याबाबत रोहित नागटिळे यांच्याकडे तक्रारी मांडल्या होत्या. या समस्यांची दखल घेत, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

    तत्पर, तरुण आणि ऊर्जावान नेतृत्व म्हणून रोहित नागटिळे यांनी प्रचारादरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत विश्वास संपादन केला. “केवळ आश्वासने देणार नाही, तर दिलेला शब्द प्रत्यक्ष कामातून पूर्ण करून दाखवीन,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली होती, आणि त्याच विश्वासावर नागरिकांनी त्यांना मोठे मताधिक्य दिल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे.

No comments