तडवळे येथे चतुर्थ तपपूर्ती अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात ; ७५० ज्ञानेश्वरी वाचकांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला भक्तीमय रंग
तरडगाव (संजय किकले) - तडवळे (ता. फलटण) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून आयोजित चतुर्थ तपपूर्ती अखंड हरिनाम सप्ताह भव्यदिव्य वातावरणात सुरू असून ७५० ज्ञानेश्वरी वाचकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष भक्तीमय स्वरूप लाभले आहे.
सप्ताह ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान आयोजित असून या काळात दररोज पहाटे ते रात्रीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी काकडा आरती, त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा, हरिपाठ आणि रात्री महात्म्यांची कीर्तन सेवा अशा समृद्ध कार्यक्रमांनी परिसर दुमदुमत आहे. दररोजच्या कीर्तनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन आहे.
सप्ताह कालावधीत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्र कथांचे निवेदन हभप कुमार खराडे करत असून रात्रीच्या कीर्तन सेवेत हभप महादेव महाराज राऊत, ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे, कृष्णाजी महाराज नवले, कन्होबा महाराज देहूकर, गुरुवर्य बंडातात्या महाराज कराडकर, पोपट महाराज पाटील, राम महाराज डोंगर, जयवंत महाराज बोधले हे मान्यवर कीर्तनकार आपले वाणीदान देत आहेत.
या उत्सवाचे आयोजन समस्त ग्रामस्थ मंडळ तडवळे, श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, तसेच गावातील विविध मंडळांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले आहे. सप्ताह यशस्वी करण्यासाठी हभप अनिल महाराज कुंभार, हभप कुमार महाराज खराडे, हभप सचिन महाराज मदने, हभप दत्ता महाराज खराडे, हभप वैष्णव महाराज भोसले यांसह सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

No comments