स्वामी समर्थांच्या पादुकांचा दर्शन सोहळा ; फलटण येथे दि.९ रोजी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - : अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पवित्र पादुकांचा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील भाविकांसाठी दिव्य दर्शन दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, अक्कलकोट (जि. सोलापूर) यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली. दरम्यान फलटण येथे स्वामी समर्थांच्या पादुकांचे आगमन दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता श्रीराम मंदिर फलटण येथे होणार आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की अक्कलकोट राजघराण्याचे मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष कृपावंत होऊन आपल्या पवित्र पादुका प्रदान केल्या होत्या. या पवित्र चरणकमलांचे दर्शन विद्यमान नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले तिसरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे.
या पवित्र आणि आशयपूर्ण पादुका महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील प्रमुख नगरात भाविकांच्या दर्शनासाठी ६ डिसेंबरपासून दौरा करणार आहेत. या सोहळ्याचे ८ डिसेंबरला साताऱ्यात व ९ डिसेंबरला फलटणमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर मिरज, सांगली, मुधोल, पोण्डा, पणजी, सावंतवाडी, कागल, कोल्हापूर, भोर, पिंपरी-चिंचवड, पुणे, मुंबई, ठाणे आणि डोंबिवली आदी ठिकाणी भाविकांना कृपापादुकांचे दिव्य दर्शन घेण्याची अद्वितीय योग उपलब्ध होणार आहे.
या सर्व नगरांच्या राजघराण्यांत पवित्र पादुकांचे विधिवत पूजन करण्यात येईल आणि त्यानंतर भाविकांना दर्शन व कृपा आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी त्या प्रत्येक ठिकाणच्या योग्य स्थानात विधिवत विराजमान करण्यात येणार आहेत. दर्शनाची संपूर्ण व्यवस्था याच ठिकाणी करण्यात येत आहे.
स्वामींच्या कृपापादुकांच्या दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, येणाऱ्या भक्तांमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारून जाईल, असा विश्वास सर्व राजघराण्यांनी व्यक्त केला आहे.
या पवित्र कार्यासोबतच अजून एक कार्य श्री अक्कलकोट राजघराण्यांचे मालोजीराजे भोसले तिसरे पार पाडू इच्छित आहे, ते म्हणजे स्वामीभक्तांच्या सेवेसाठी 'अनुभूती' या नावाचा एक भव्य प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे.
या प्रकल्पांतर्गत श्री स्वामी समर्थांची १०८ फूट भव्य दिव्य मूर्ती, ध्यान केंद्र, चिकित्सालय, उद्यान, भक्तनिवास आदी अशा मूलभूत आणि पूरक सुविधांच्या विकासाचे नियोजन करण्यात आले आहे.

No comments