फलटणच्या नगराध्यक्ष पदासाठी समशेरदादांच्या उमेदवारीला तरुणाईचा जोरदार पाठिंबा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 9 - आगामी फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर, शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दादांच्या नेतृत्वाला नागरिक, तरुणवर्ग, उद्योजक आणि व्यापारी बांधवांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून “फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी खात्रीशीर नेतृत्व म्हणजे दादा” असा विश्वास नागरिकांमध्ये दृढ होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक तसेच नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे. त्यांचा सौम्य स्वभाव, निर्णयक्षम वृत्ती आणि लोकसंपर्क कौशल्य यामुळे ते शहरातील तरुण आणि ज्येष्ठ मतदारांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत.
प्रचाराच्या सुरुवातीलाच त्यांच्या भेटीगाठींना मोठा उत्साह दिसत असून विविध प्रभागांमध्ये नागरिकांचा ओघ वाढत आहे. विशेषतः युवक आणि महिला मतदारांचा प्रतिसाद उल्लेखनीय आहे. “स्वच्छ प्रशासन, दर्जेदार रस्ते, व्यापाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा, पारदर्शक कारभार आणि अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेणे तसेच नव्या विकास उपक्रमांना गती देणे” हे आपले प्राधान्य असेल, असे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधकांच्या प्रचाराला अजून गती मिळालेली नसतानाच शहरात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची लाट दिसू लागली आहे. येत्या काही दिवसांत प्रचाराचा जोर अधिक वाढणार असून फलटणच्या राजकीय वातावरणात दादांच्या उमेदवारीने नवीन उत्साह संचारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

No comments