Breaking News

वाघाच्या हल्ल्याचा व्हिडीओ बनावट – वनविभागाचे स्पष्टीकरण

Tiger attack video is fake – Forest Department clarifies

    चंद्रपूर, दि. ०७  : ब्रम्हपुरी वनविभागातील वनविश्रामगृह येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. या व्हिडीओबाबत चंद्रपूर वनविभागाने स्पष्ट केले आहे की, ब्रम्हपुरी वनविभागात अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही.

    वनविभागाच्या माहितीनुसार, संबंधित व्हिडीओ पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence – AI) साहाय्याने तयार केलेला बनावट व्हिडीओ आहे. या व्हिडीओद्वारे समाजकंटकांकडून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा आणि सत्यविरहित अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    अलीकडील काळात ब्रम्हपुरी परिसरात मानव-वन्यजीव संघर्षाच्या काही घटना घडल्या असल्या तरी, या बनावट व्हिडीओचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.मुख्य वनसंरक्षक (प्रा.) आर. एम. रामानुजम यांनी सांगितले की, “या व्हिडीओची निर्मिती व प्रसारण करणाऱ्यांविरुद्ध विभागाने गंभीर दखल घेतली असून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

    अशा प्रकारच्या खोट्या व दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओंवर विश्वास ठेवू नये. अशा माहितीची नोंद आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या वनविभाग किंवा पोलिस विभागास माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

No comments