योगेश भीमराव कापसे यांचा राजे गटातून भाजपात प्रवेश; प्रभाग ५ मध्ये भाजपला बळ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ : प्रभाग क्रमांक ५ मधील युवानेते योगेश भीमराव कापसे यांनी राजे गटाला राम राम करत, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी आघाडीला मजबुती मिळवून देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती कार्यक्रमावेळी देण्यात आली.
योगेश कापसे यांच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ५ मधील निवडणूक समीकरणांमध्ये उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या युवा संपर्क, सामाजिक कार्य आणि स्थानिक पातळीवरील प्रभावामुळे भाजपाच्या प्रचारात नवी ऊर्जा येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर, प्रभाग क्रमांक ५ मधील भाजप उमेदवार रोहित नागटिळे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात कापसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
भाजपाच्या नेतृत्वाकडून कापसे यांच्या प्रवेशाचे स्वागत करण्यात आले असून, त्यांच्या सहभागामुळे प्रभाग ५ मध्ये पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

No comments