प्रभाग ५ मध्ये रोहित नागटिळे यांचा दमदार जनसंपर्क; नागरिकांच्या प्रश्नांना दिली ठोस ग्वाही
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रोहित नागटिळे यांनी आपला प्रचार वेगात सुरू केला आहे. प्रभागातील नागरिकांशी संपर्क साधत त्यांनी त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक समस्यांची माहिती जाणून घेतली.
या भेटीदरम्यान नागरिकांनी प्रभागात वाढत चाललेली रस्त्यांची दुरावस्था, पाण्याची तीव्र गैरसोय, सांडपाणी निचऱ्याचा अपुरा वेग, तसेच गटार व्यवस्थेतील त्रुटी याबाबत रोहित नागटिळे यांच्याकडे तक्रारी मांडल्या. या सर्व समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची ग्वाही नागटिळे यांनी नागरिकांना दिली.
तत्पर, तरुण आणि उत्साही नेतृत्व म्हणून रोहित नागटिळे प्रभागात चांगली लोकप्रियता मिळवत आहेत. नागरिकांमध्ये थेट मिसळून, त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेणे आणि त्यावरील तोडगा मांडणे, यामुळे त्यांचा जनसंपर्क अधिक मजबूत होत आहे.
“केवळ आश्वासने देणार नाही, तर दिलेला शब्द कामातून पूर्ण करून दाखवीन,” असा ठाम विश्वास रोहित नागटिळे नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त करत आहेत. रोजच्या गाठीभेटीच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराला गतिमान स्वरूप दिले असून प्रभाग ५ मध्ये त्यांची जनसंपर्क मोहीम मोठ्या प्रमाणावर गती घेत आहे.

No comments