समाजहिताचे विश्वासू नेतृत्व : माजी नगरसेवक सनी अहिवळे
फलटण शहरातील राजे गटाचे विश्वासू नेतृत्व, समाजसेवेचा ध्यास घेतलेले आणि लोकहितासाठी सदैव तत्पर असलेले माजी नगरसेवक सनी संजय अहिवळे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेले उपक्रम उल्लेखनीय असून, ते आजही फलटणच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आपले स्थान कायम ठेवून आहेत.
मंगळवार पेठ परिसरात नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांनी रस्ते, गटारे, लाइट व्यवस्था यांसह कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. याचबरोबर मंगळवार पेठ येथे जिम, वाचनालय, समाजमंदिर, शौचालय आणि शाळा अशा मूलभूत सुविधांचा विकास करून परिसराचा चेहरामोहरा बदलला.
करोना काळात सनी अहिवळे यांनी परिसरातील नागरिकांसाठी सलग एक महिना उत्तम दर्जाचे जेवण वितरण केले. तसेच दोन वेळा गृहपयोगी वस्तू आणि किराणा किटचे वाटप करून अनेक कुटुंबांना दिलासा दिला. संकटकाळात त्यांनी केलेले हे कार्य आजही लोकांच्या मनात घर करून आहे. तसेच कोरोना लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
सनी अहिवळे हे आरोग्य व सामाजिक जनजागृती उपक्रम राबविण्यात सदैव अग्रेसर असतात. त्यांनी मंगळवार पेठ येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिरे, रक्तदान शिबिरे, महिला शिबिरे व मेळावे आयोजित केले. तसेच विविध रोगांविषयी माहिती व उपचार जनजागृती अभियान राबविले आणि शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले आहेत.
सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून सनी अहिवळे आणि त्यांची पत्नी सौ. सुपर्णा अहिवळे यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवले जातात. यात विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, शालेय साहित्य वाटप, आदर्श महिला पुरस्कार वितरण, महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, स्पर्धा परीक्षेतील व दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, तसेच लहान मुलांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.
त्यांनी अनाथाश्रम व वृद्धाश्रम भेटी, साडी, शाल, फळे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशा उपक्रमांद्वारे गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दरवर्षी वारकऱ्यांना जेवण वितरित केले जाते. तसेच अतिवृष्टीने बाधित सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करून तो पूर्णही केला.
त्यांची आई सौ. नंदा संजय अहिवळे या फलटण नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष आणि माजी नगरसेवक, तर वडील संजय अहिवळे हे प्रशासकीय सेवेत तलाठी म्हणून कार्यरत राहिले तसेच तलाठी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. अशा समृद्ध सामाजिक व प्रशासकीय वारशातून आलेले सनी अहिवळे आजही तळमळीने लोकसेवा करत असून, त्यांच्या कार्यामुळे ते फलटणच्या जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.

No comments