Breaking News

भर रस्त्यात एसटी बस बंद पडल्याने प्रवाशांचा खोळंबा - मदतीला थांबलेली दुसरीही बस ब्रेकडाऊन!

Passengers suffer as ST bus breaks down on the road

    दहिवडी (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.10 - महाराष्ट्र शासनाची सर्वात मोठी अर्थवाहिनी आणि सर्वसामान्य जनतेची आपुलकीची “लाल परी” म्हणजेच एसटी बस, खेडोपाडी वाडीवस्त्यांवर प्रवाशांना पोहोचवणारी ही सेवा अलीकडे वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

    सातारा जिल्ह्यातील मेढा आगाराची एमएच-४० एन-९२८८ ही एसटी बस पंढरपूरवरून मेढ्याकडे निघालेली असताना, खटाव तालुक्यातील पुसेगाव जवळ अनपेक्षित प्रकार घडला. पुसेगावच्या मागे सुमारे दोन किलोमीटरवर आधीच एक एसटी बस बंद पडलेली होती. त्या गाडीच्या चालकाने रस्त्यावर आडवे उभे राहून मदतीसाठी ९२८८ क्रमांकाच्या बसला हात दाखवला.

    चालकाने विनंती मान्य करत गाडी थांबवली आणि बंद पडलेल्या बसमधील प्रवाशांना आपल्या गाडीत घेतले. परंतु मदतीला आलेली ९२८८ बसदेखील ब्रेकडाऊन झाली! या घटनेमुळे दोन्ही गाड्यांतील प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. अनेक प्रवासी वेळेवर इच्छित स्थळी पोहोचू शकले नाहीत.

    वारंवार रस्त्यात बंद पडणाऱ्या एसटी बसमुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, “ही मालिका थांबणार का?” असा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे.

No comments