तलवार गेली आणि लेखणी आली, या लेखणीच्या बळावर महात्मा फुलेंनी समाजजागृती केली - डॉ. बी. के. यादव
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ - अखिल भारतीय समता परिषदेचा 33 वा वर्धापन दिन फलटण येथील लोकमान्य नर्सिंग होम येथे सातारा जिल्हा अध्यक्ष डॉ. बी. के. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला. या निमित्ताने लोकमान्य नर्सिंग होम हॉस्पिटल मधील रुग्णांना फळे वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर गिरीश बनकर, दशरथ फुले, रमेश शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल रासकर यांनी केले तर आभार प्रदर्शन महादेवराव सोनवलकर यांनी मानले.समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. बी. के. यादव आपल्या प्रेरणादायी भाषणात म्हणाले की,
“महात्मा फुले म्हटले की मला दोनच नावे समोर येतात, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले. छत्रपतींनी तलवारीच्या ताकदीवर स्वराज्य निर्माण केले, आणि फुलेंनी लेखणीच्या बळावर समाजप्रबोधनाची क्रांती घडवली.”
ते पुढे म्हणाले की, महात्मा फुले यांच्यावर किती अन्याय आणि अत्याचार झाले हे वाचल्यावर हे लक्षात येते. “तलवार गेली आणि लेखणी आली,” या लेखणीच्या बळावर महात्मा फुलेंनी समाजजागृती केली. पॅरॅलिसिस झाल्यानंतरही त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ समाजाला दिला. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र समाजासमोर आणणारे तेच होते.
डॉ. यादव यांनी पुढे सांगितले की, महात्मा फुले यांच्या पराक्रमात लहुजी वस्ताद साळवे यांचा मोठा वाटा होता. फुले समाधीच्या शोधार्थ गेले असता, जेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा लहुजी वस्तादांच्या तालमीतील पैलवानांना सोबत घेत फुले यांनी जो कोणी त्यांना समाधी शोधण्यासाठी आडवत होता त्याला दूर केले . लहुजी वस्ताद म्हणाले होते , “क्रांतीज्योतीच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ मात्र लहुजी वस्तादांशी आहे.”
बहुजन समाजातील समतेसाठी कार्य करणाऱ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना बळकटी देण्यासाठी एक नोव्हेंबर 1992 रोजी ‘फुले–शाहू–आंबेडकर’ विचारधारेवर आधारित समता परिषदेची स्थापना करण्यात आली. आज ती अखिल भारतीय समता परिषद म्हणून देशभर कार्यरत आहे.
फलटण येथे या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रमाद्वारे फळवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कापसी सोसायटीचे विजयराव यादव, लोकमान्य उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक श्री. जगताप, लोकमान्य पतसंस्थेचे चेअरमन घनवट साहेब, डॉ. अमित मोरे, तसेच बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

No comments