जि.प. सातारा प्राथमिक शिक्षण विभागाचा भ्रष्ट व गलथान भ्रष्ट कारभारामुळे सचिन काकडे यांचा मृत्यू - मा.खा.अमर साबळे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ सप्टेंबर२०२५ - शासनाकडून दिव्यांग शिक्षकांच्या तपासणी संदर्भात काढलेल्या फेर जीआरच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात दिव्यांगग्रस्त शिक्षकांची तपासणी करणेची प्रक्रिया पूर्णत: चुकीची आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट व गलथान कारभारामुळे अधिकाऱ्यांच्या मानसिक छळामुळे सचिन शंकर काकडे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून विशिष्ट जातींना टार्गेट केले जात असल्याचा असा आरोप भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार अमर साबळे यांनी केला.
सचिन काकडे सर यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे आवाज उठविण्यासाठी फलटण येथील विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार साबळे बोलत होते. यावेळी चेअरमन सुधीर अहिवळे उपस्थित होते.
यावेळी अमर साबळे म्हणाले, सचिन शंकर काकडे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडी येथे कार्यरत होते. त्यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा त्रास झाला होता. त्यामध्ये त्यांची एन्जोप्लास्टी करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टल अंतर्गत यु डी आय डी प्रणालीनुसार सन 2022 मध्ये शासनाच्या त्रिसदस्य वैद्यकीय पथका मार्फत सचिन काकडे यांची तपासणी करण्यात आली होती आणि त्यांनी ४१ टक्के कायम दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले होते. शासन धोरण व जिल्हा परिषदेच्या फेर तपासणी मध्ये सचिन काकडे यांचे दिव्यांग प्रमाणपत्र २९ टक्के आले. या फेर तपासणीत ते अपात्र आल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना निलंबन व फौजदारी गुन्हे दाखल करण्याची नोटीस बजावून ३ दिवसात खुलासा करण्यास सांगितला होते. या मानसिक दबावामुळेच सचिन काकडे यांचा बळी गेलेला आहे. वैद्यकीय तपासणीत जे शिक्षक अपात्र झालेले आहेत. त्यांना कराड येथील एका नामांकित हॉटेल येथे बोलवून ब्लॅकमेलिंग केले जात आहे.
ज्या शिक्षकांनी खोटी प्रमाणपत्र घेतले आहेत. त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. परंतु ज्यांच्याकडे खरी प्रमाणपत्र आहेत, त्यांना कसलाही त्रास झाला नाही पाहिजे. त्यांना त्रास झाल्यास आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. त्याचबरोबर जिल्हा परिषद प्रशासनाने पारदर्शक चौकशी करावी व दुसरा सचिन काकडे होऊ नये याची खबरदारी घ्यावी.
अमर साबळे पुढे म्हणाले, ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खोटी प्रमाणपत्र दिले आहेत त्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत असू. वेळप्रसंगी आम्ही न्यायालयीन लढाई लढण्याची आमची तयारी आहे. प्रसंगी वेळ पडल्यास प्रशासनावर अट्रॅसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करू असा इशाराही अमर साबळे यांनी दिला.
No comments