नरेगा मधील ग्रामरोजगार सहायकांना मानधन मिळत नसल्याने पुकारणार राज्यव्यापी काम बंद आंदोलन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१३ फेब्रुवारी २०२५ - नरेगा मार्फत आमच्याकडून काम करून घेतले जाते, मात्र ठरल्याप्रमाणे आम्हाला मानधन मिळत नाही, त्यामुळे राज्यातील सर्वच ग्रामरोजगार सहाय्यक राज्यव्यापी काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन प्रभारी गटविकास अधिकारी सतीश कुंभार यांना दिले.
महात्मा गांधी नरेगा चे गाव पातळीवर चांगले काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ग्रामरोजगार सहाय्यक यांची निवड केली असून त्याप्रमाणे आजपर्यंत खऱ्या अर्थाने ग्रामरोजगार सहाय्यकांनी अत्यंत चांगले काम करून राज्याची मान उंचावली आहे. परंतु कोणतेही मासिक वेतन किंवा मानधन नसल्या कारणाने रोजगार सेवक प्रचंड आर्थिक संकटात आहे. महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ पासून रुपये ८,००० मानधन प्रवास भत्ता, प्रोत्साहन भत्ता व इतर सुविधा देण्याबाबत परिपत्रक जारी केले होते. परंतु ते अद्याप लागू न केल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक विकास संघटनेच्या वतीने दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
दरम्यान या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामरोजगार सहाय्यकांना पूर्ण वेळ शासन निर्णय काढावा व कायम सेवेत घ्यावे.ग्रामरोजगार सहाय्यकांना स्वतंत्र वेतनश्रेणीचा शासन निर्णय काढावा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही स्वतंत्र यंत्रणा म्हणून मान्यता द्यावी.३ ऑक्टोबर २०२४ रोजी काढण्यात आलेल्या जीआर ची अंमलबजावणी करावी. ग्रामरोजगार सहाय्यकांना विमा कवच मिळावे.वरील सर्व मागण्याकरिता संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन छेडण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष सुळ यांनी दिला आहे.या निवेदनात तालुकाध्यक्ष संतोष सुळ, कालिदास गोडसे, अमोल गावडे, गौतम भोसले, मंगेश शिंदे, प्रेम मोरे, सुधीर यादव, राजेंद्र गोफणे, सौ. रोहिणी कदम, बापुराव घुले, शरद जाधव, सागर पिसाळ, प्रमोद खरात यांच्यासह अनेक सह्या आहेत.

No comments