खेळाडूंना सर्वोतपरी सहकार्य करणार आ. सचिन पाटील ; फलटण तालुका क्रीडा संकुल पुनरुज्जीवनासाठी आढावा बैठक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ सप्टेंबर २०२५ - तहसिल कार्यालय फलटण येथे तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत तालुका क्रीडा संकुलाचे पुनरुज्जीवनासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान तालुक्यातील खेळाडूंना सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार सचिन पाटील यांनी दिले.
मौजे जाधववाडी गावच्या हद्दीतील एकूण ९ एकर क्षेत्र असलेल्या क्रीडा संकुलात इनडोअर हॉल, ४०० मीटर धावण मार्ग, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम मागील काही वर्षांपूर्वीच पूर्ण झालेले आहे, परंतु सद्यस्थितीत क्रीडा संकुल मृत अवस्थेत आहे. याचबरोबर येथील बहुउद्देशीय हॉल मध्ये सिंथेटिक फ्लोरिंग देखील खराब झाले असून, क्रीडा संकुलाची उभारणी झालेपासून त्याचा तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडू विद्यार्थ्यांना कधीच उपयोग झाला नाही असे मत आमदार सचिन पाटील यांनी या बैठकीत व्यक्त केले.
यानंतर सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला व यामध्ये कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीवर चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने सध्याच्या क्रीडा संकुलाच्या इमारतीचे दुरुस्ती, कलरकाम, वीजेची सोय, संगणक संच, प्रिंटर सह स्टेशनरी,धावपट्टी नूतनीकरण, सिंथेटिक फ्लोरिंग दुरुस्ती, खो खो, हॉकी, कबड्डी, स्विमिंग टॅंक, जिम्नेशियम यांसह इतर खेळांची सुविधा उपलब्ध करण्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार सचिन पाटील यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी व तालुका क्रीडा अधिकारी याना सदर नूतनीकरण किंबहुना अद्यावत क्रीडा संकुल निर्माण करण्यासाठी तत्काळ प्रस्ताव तयार करावेत अश्या सूचना देताना यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले. तालुक्यातील गोर गरीब सर्व सामान्य कुटुंबातील खेळाडू विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून, तालुक्यातून उत्कृष्ट खेळाडू घडावेत व राज्यच नव्हे तर देश पातळीवर खेळाडू खेळले पाहिजेत अशी आशा यावेळी आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केली.
    या बैठकीस आमदार सचिन पाटील यांच्यासह, तहसीलदार डॉ अभिजित जाधव. जिल्हा क्रीडा अधिकारी तारळकर साहेब, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, फलटण नगरपरिषद मुख्याधिकारी निखिल मोरे यांचेसह विविध खेळांचे कोच उपस्थित होते.
 
 

 
 
.jpg) 
 
.jpg) 
 
 
 
No comments