कृषि उत्पन्न बाजार समितीस सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
State-level award presented to Agricultural Produce Market Committee for the third consecutive time
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ सप्टेंबर २०२५ - महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे या संस्थेकडून देण्यात येणाऱ्या मा.वसंतरावदादा पाटील स्मृति पुरस्कार सन 2025 साठी फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीची उत्कृष्ठ कार्य करणारी बाजार समिती म्हणुन निवड करण्यात आली आहे. फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने समितीच्या संचालिका सौ.जयश्री गणपत सस्ते यांनी समितीचे व्हा.चेअरमन श्री.भगवानराव होळकर, उपस्थित संचालक, समितीचे सचिव व स्टाफ यांच्या समवेत बहुचर्चीत, प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार स्विकारला.
समितीस यापूर्वी प्राप्त झालेले पुरस्कार- 1)वसंतरावदादा पाटील स्मृति पुरस्कार, 2) महाराष्ट्र शासनाचे स्टेट रँकिंग (स्मार्ट)- जिल्ह्यात सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक, कोल्हापुर विभागात प्रथम व द्वितीय क्रमांक, 3)नवराष्ट्र ...नवभारत टाइम्स चा बेस्ट एपीएमसी पुरस्कार. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा.सभापती, महाराष्ट्र विधान परिषद यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे कल्पक दृष्टीकोनातुन कृषि उत्पन्न बाजार समिती, फलटण येथे शेतकरी केंद्रबिंदू मानुन काम करीत असताना शेतकऱ्यांच्या विविध शेती विषयक समस्यांची सोडवणुक करुन, शेतमालाला जास्तीत जास्त दर आणि आवक आणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबवत फलटण तालुक्यात दुसऱ्या हरितक्रांतीमुळे उत्पादित होत असलेल्या शेतमालासाठी सक्षम अशी पणन व्यवस्था देवुन फलटण कृषि उत्पन्न बाजार समिती अधिक लोकाभिमुख व स्पर्धाक्षम करणेकरिता संचालक मंडळाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणेसाठी सदैव तत्पर राहिलेली आहे.
बाजार समिती संघाच्या सर्व निकषामध्ये फलटण बाजार समितीने गुणवत्तापुर्वक काम केले असुन त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन, लेखापरिक्षण, दोष दुरुस्ती, शेतकऱ्यांना सर्व सोयी सुविधा, चालु वर्षात उत्पन्नामध्ये वाढ, वृक्षारोपण व शासनाच्या ऑनलाईन सुविधेमध्ये भाग घेवुन ई-नाम कामकाज राबविणे इ.कामे केली असलेने उत्कृष्ठ कार्य करणारी बाजार समिती म्हणुन सन्मानित करणेत आले.
सदर पुरस्कारासाठी समितीचे व्हाईस चेअरमन श्री.भगवानराव होळकर, संचालक श्री.टी.डी.शिंदे, श्री.सचिन लोखंडे, श्री.शंभुराज पाटील, श्री.प्रविण खताळ, श्री.चांगदेव खरात, श्री.अक्षय गायकवाड, श्री.संतोष जगताप, श्री.संजय कदम, श्री.निलेश कापसे तसेच समितीचे सचिव श्री.शंकरराव सोनवलकर, श्री.के.पी.सस्ते, ग्रेडर व कु.एस.एस.लंगुटे, संगणक चालक उपस्थित होते.
पुरस्कार मिळालेबद्दल ना.श्री.जयकुमार रावल, मंत्री, पणन व राजशिष्टाचार, महाराष्ट्र राज्य, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा.सभापती, महाराष्ट्र विधान परिषद, दिपकराव चव्हाण, माजी आमदार, फलटण-कोरेगांव विधानसभा मतदारसंघ, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा तसेच आवक आणणारे शेतकरी, मार्केट फंक्शनरीज यांनी फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे विशेष अभिनंदन केले आहे.
राज्याचे पणन संचालक विकास रसाळ, जिल्हा उपनिबंधक, सह.संस्था, सातारा संजयकुमार सुद्रीक, विभागीय उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ, कोल्हापुर डॉ.सुभाष घुले, सहाय्यक निबंधक, सह.संस्था, फलटण जे.पी.गावडे यांनी सहकार व पणन विभागाचे वतीने अभिनंदन केले आहे.
राज्याची सहकार व पणन विषयक शिखर संस्था महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्या.पुणे यांचेकडून दिला जाणारा बहुचर्चीत, प्रतिष्ठेचा व स्टेट लेवल वसंतरावदादा पाटील स्मृति पुरस्कार सन 2025 फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस प्राप्त होत असताना सदर पुरस्कार फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस सलग तिसऱ्यांदा मिळालेला असुन यानिमित्ताने राज्यस्तरीय पुरस्काराची हॅटट्रीक फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने निश्चितच केलेली आहे.
बाजार समितीचे शेतकरी केंद्रबिंदू मानुन सुरु असलेले विधायक, लोकाभिमुख कामकाजातील सातत्य, आवक आणणारे शेतकरी, अडते, खरेदीदार, हमाल, मापाडी, सर्व संचालक, समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर व त्यांचा सर्व सहकारी स्टाफ यांचे टिमवर्कचे यश, फलित असल्याचे समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी नमुद केले आहे तसेच आवक आणणारे शेतकरी, अडते, हमाल, मापाडी व इतर सर्व घटकांचे आभार व्यक्त केले आहेत.
No comments