Breaking News

हॉकीमध्ये राष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्याची फलटणची वैभवशाली परंपरा कायम राहील : श्रीमंत संजीवराजे


Phaltan's glorious tradition of producing national hockey players will continue: Shrimant Sanjeev Raje

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.११ सप्टेंबर २०२५  -जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा, मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण, दि हॉकी, सातारा व फलटण तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, फलटण  यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथील कै माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रीडा संकुल (घडसोली मैदान) येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय नेहरू कप हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र खो-खो असोसिएशन चे अध्यक्ष मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

    यावेळी उपस्थितांचे स्वागत हॉकी प्रशिक्षक सचिन धुमाळ व जेष्ठ हॉकी खेळाडू यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तसेच नूतन फलटण तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे व ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक जगन्नाथ धुमाळ यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

    या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की हॉकीमध्ये मेजर ध्यानचंद हे आजवरचे जगातील सर्वोत्तम  खेळाडू आहेत. त्यांच्यामुळे आपणास हॉकीचा सुवर्णकाळ पाहवयास मिळाला. भारतीय संघाने तब्बल आठ वेळा सुवर्ण पदक मिळविण्याची सुवर्णमय कामगिरी केली आहे. भारताचा हा जागतिक विक्रम आजही अबाधित आहे.

    आजही हॉकीमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करीत आहे. फलटण मध्ये ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक श्री जगन्नाथ धुमाळ यांनी हॉकी या खेळाची मुहूर्तमेढ रोवली, त्यांना फलटणच्या हॉकीचे जनक म्हटले जाते. यामुळे हॉकीच्या राष्ट्रीय संघात फलटणचे खेळाडू चमकदार कामगिरी करीत आहेत व आपल्या फलटण शहाराचा नावलौकिक वाढवत आहेत, ही बाब अभिमास्पद आहे. भविष्यातही फलटणची ही उज्वल परंपरा कायम राहील असा विश्वास व्यक्त केला.

    या उद्घाटन प्रसंगी नूतन तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक जगन्नाथ धुमाळ , निवृत्त क्रीडा अधिकारी महेश खुटाळे, क्रीडा अधिकारी रवी पाटील, क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य वसंतराव शेडगे, पर्यवेक्षक आर.बी. निंबाळकर, क्रीडा समितीचे सदस्य महादेव माने, संजय फडतरे, पत्रकार  किरण बोळे, जेष्ठ हॉकी खेळाडू सुजित निंबाळकर, आंतरराष्ट्रीय हॉकी पंच सुमित मोहिते आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

    यावेळी सूत्रसंचालन सचिन धुमाळ यांनी केले तर आभार  बी.बी. खुरंगे यांनी मानले.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून दि हॉकी सातारा संघटनेच्या वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते सातारा जिल्ह्याचे व फलटण तालुक्याचे क्रीडाक्षेत्रात नाव उंचावल्या बद्दल फलटण च्या राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडूं श्रेया चव्हाण, अनुष्का केंजळे, निकिता वेताळ, सिद्धी केंजळे, तेजस्विनी कर्वे, अनुष्का चव्हाण,वेदिका वाघमोडे, मानसी पवार, मृण्मयी घोरपडे,आरोही पाटील, गायत्री खरात व  खो-खो ची राष्ट्रीय खेळाडू संचिता गायकवाड या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.

No comments