गंधवार्ता न्यूज इम्पॅक्ट ; शंकर मार्केटच्या जीवघेण्या गर्दीतुन पालकांना दिलासा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१८ सप्टेंबर २०२५ - फलटण शहरातील शंकर मार्केट परिसरातील सकाळची वेळ पालक व नागरिकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत होती. आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी येणाऱ्या पालकांना दररोज प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत होता. या जीवघेण्या गर्दीतून वाहन चालवताना "साक्षात मृत्यू डोकावत आहे" अशी भावना पालकांमध्ये निर्माण झाली होती.
गंधवार्ता न्यूजने ही गंभीर बाब प्रकाशात आणल्यानंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. आजपासून मंडई दुसऱ्या ठिकाणी भरवण्यात आली असून, त्यामुळे पालकांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शंकर मार्केट परिसरात दररोज सकाळी भाजी मंडई भरते. शहरभरातील नागरिक भाजी खरेदीसाठी येथे गर्दी करत असतात. याच परिसरात दोन शाळा असल्याने सकाळी शाळकरी मुले सोडण्यासाठी व आणण्यासाठी पालकांची वाहने मोठ्या संख्येने येतात.
मात्र, भाजी विक्रेत्यांचे अडमुठ्या पद्धतीने केलेले रस्त्यावरचे बसणे, परिसरातील नागरिकांची रस्त्यातील व रस्त्यालगतची पार्किंग, तसेच रिक्षांची आडवी-तिडवी उभी राहणारी वाहने यामुळे रस्ता प्रचंड अरुंद होत होता. परिणामी दररोज वाहतूक कोंडी, पालक व विक्रेते यांच्यात वादविवाद, तसेच अपघाताचा धोका कायम निर्माण होत होता.
गंधवार्ता न्यूजने पालकांचा आवाज पोहोचवल्यानंतर अखेर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली. शंकर मार्केटमधील सकाळची भाजी मंडई हलवून दुसऱ्या ठिकाणी भरवण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर सुटली असून पालकांना जीवघेण्या गर्दीतून दिलासा मिळाला आहे.
No comments