फलटण पंचायत समितीत अधिकाऱ्यांची मनमानी ; बायोमेट्रिक मशीन बंद - खुर्च्या रिकाम्या
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० सप्टेंबर २०२५ - फलटण तालुक्यात सत्ता बदल झाला, मात्र पंचायत समिती सारख्या महत्त्वाच्या संस्थेला गटविकास अधिकारी काही मिळेना व असलेल्या असलेल्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना इतर अधिकारी काही ऐकेना, अशी परिस्थिती झाली असून, पंचायत समिती फलटण येथे कोणतेही अधिकारी आपल्या खुर्चीवर नसतात, तर गेली अनेक महिने झाले येथील बायो मेट्रिक (पंचिंग मशीन) बंद असल्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून पंचायत समितीमध्ये भोंगळ कारभार सुरु असल्याचे भयावाह चित्र पाहायला मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी असतात, मात्र फलटण पंचायत समितीचा कारभार म्हणजे, असून अडचण व नसून खोळंबा अशी झाली असून, प्रभारी पद असलेल्या अधिकाऱ्याकडे फक्त बसण्यासाठी खुर्ची आहे, बोर्डाला नावं आहे, मात्र कोणतेही अधिकार नसल्याची चर्चा पंचायत समितीत असून, त्यामुळे इतर अधिकारी कधीच जाग्यावर उपलब्ध नसतात तर सर्वसामान्य जनतेने फोन केला तर सांगतात की, मी भागात आहे, मात्र ते कधीच भागात नसतात तर सेटलमेंट करतात व लाखो रुपये कमावत असतात, आपल्या पदाचा दुरुपयोग करून मनमानी कारभार करीत असल्याने, या अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेने खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे.
फलटण पंचायत समितीत सकाळी 9.15 ते 6.15 अशी कामाची वेळ आहे, परंतु सरकारने या बाबतीत कोण आले? कोण गेले ? यासाठी बायोमेट्रिक मशीन बसविली आहे, मात्र तीच गेली अनेक महिने झाली बंद असून, ती दुरुस्त करण्यासाठी प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांना वेळ नाही, यामुळे 'तेरी भी चूप मेरी भी चूप' अशी अवस्था झाली असून, या प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांचे कोणच ऐकत नसल्याची चर्चा पंचायत समितीमध्ये सुरु आहे.
पंचायत समिती फलटण अंतर्गत येणाऱ्या विभागाचा रोखठोक पंचनामा लवकरच नावासाह व कुचकामांसह जनतेला वाचायला मिळणार आहे, बिले काढण्यासाठी द्यावे लागतात पैसे तर गटशिक्षणाधिकारी यांचा महान करनामा,पुराव्याणीशी आता कागद बोलणार... मग जिल्हा परिषद काय कारवाई करणार....?
No comments