अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे वस्तूनिष्ठ अहवाल सादर करा - पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रशासनास सूचना
सातारा दि.22: पावसाने उघडीप दिली असून महसूल, कृषि, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम अशा सर्वच यंत्रणांनी अतिवृष्टी झालेल्या भागात फिल्डवर जाऊन तात्काळ पंचनाम करावेत, कृषिचे पंचनामे करताना जिओ टँगींगसह छायाचित्रे घेवून वस्तूनिष्ठ पंचनामे करावेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात रस्ते, पूल, बांधकामे, इमारती, विद्यूत यंत्रणा, सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या पुनर्उभारणीसाठी या नुकसानीचा परिपूर्ण अहवाल सादर शासनास केला जाईल व जिल्ह्यासाठी आवश्यक निधी मिळविण्यात येईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मंत्री महोदय व लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थिती व नुकसानीबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी खासदार नितीन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर जिल्हाधिकारी मल्लीकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
महाबळेश्वर, पाटण, जावली, वाई या भागात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीने नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे असे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, शेती, दुकाने, घरे, रस्ते, पूल, सार्वजनिक मालमत्ता, विद्युत यंत्रणा या सर्वांची मोठी हानी झाली आहे. यांचे वस्तूनिष्ठ पंचनामे करुन अहवाल तात्काळ सादर करावेत. नुकसान झालेल्या घटकांच्या दुरुस्तीसाठी अथवा पुनर्उभारणीसाठी निकषानुसार मिळणारा निधी कमी पडत असल्यास सर्व लोकप्रतिनिधी मिळून अधिकचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशिल राहू, प्रशासनाने मात्र सतर्क राहून परिपूर्ण आणि वस्तूनिष्ठ अहवाल द्यावेत. जेणेकरुन या संकटातून आपल्याला बाहेर पडता येईल. शेतीचे पंचनामे करताना बांधावर जाऊन पंचनामे केले जातील याची दक्षता घ्यावी. प्रत्येक बाधित शेतक-याला मदत मिळाली पाहिजे. यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. जिल्हा प्रशासनाचा परिपूर्ण अहवाल तयार झाल्यानंतर तो जिल्ह्यातील सर्व मंत्री व आमदारांना दाखवण्यात येईल, असे सांगितले.
सक्षम कामगिरीबद्दल प्रशासनाचे केले कौतुक
प्रशासनाने अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाने अंत्यत दक्ष राहून सक्षमपणे परिस्थिती हाताळली. सर्वजण फिल्डवर होते. प्रशासनाचे दक्षतेमुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही, अशा शब्दात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाचे कौतूक केले.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, मे महिन्यात सातारा जिल्ह्यात आतापर्यतचा सर्वाधिक अवकाळी पाऊस झाला आहे. या कालावधीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ अहवाल करुन सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्याला साधारणत: 8 कोटीचा नुकसान भरपाई निधी देण्यात आला आहे. ज्यांचे ई केवासी पूर्ण आहे, अशांना हा निधी वितरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे. अद्यापही ज्यांचे ई केवायसी पूर्ण नसेल त्यांनी त्वरीत ते पूर्ण करुन घ्यावे. मे मध्ये अवकाळीने झालेल्या नुकसानीत कोणीही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही यांची संबंधित यंत्रणांनी खात्री करावी. कमी पडणारा निधी लवकरच उपलब्ध करुन दिला जाईल, असे ते म्हणाले.
जे शेतकरी मे मधील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या मदतीपासून वंचित आहेत त्यांचे प्रस्ताव त्वरीत द्यावेत यासाठी आवश्यक ती रक्कम उपलब्ध करुन दिली जाईल, असे सांगून मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणाले, जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, शाळा, मोऱ्या, घरे, गोठे, पुल, इमारती, व्यक्त्ती, पशुधन, सार्वजनिक मालमत्ता यांचे नुकसान झाले आहे. त्यांचे वस्तूनिष्ठ पंचनामे जिल्हाधिकारी, आयुक्तांमार्फत शासनास त्वरीत सादर करा. भरपाईसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पंचनामे झाले नाहीत अशी कोणाची तक्रार येणार नाहीत अशी खबरदारी घ्या.
सातारा जिल्ह्यात 1 जून ते 22 ऑगस्ट अखेर जिल्ह्यात 585 हून अधिक मिलीमीटर पाऊस झाला आहे. एकूण सरासरी 88.59 टक्के आहे. 20 ते 28 मे या कालावधीमध्ये जिल्ह्यात सरासरी 294 मि.मी. पाऊस झाला. माहे मे पासून 22 ऑगस्ट अखेर पाहिला तर 879.5 मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण सरासरीच्या 126.66 टक्के इतका पाऊस झाला आहे. 17 ते 22 ऑगस्ट जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये 100 मि.मी. हून अधिक पाऊस झाला. या कालावधीत सातारा तालुक्यात 112.6 मि.मी., जावली तालुक्यात 140.2 मि.मी., पाटण तालुक्यात 145.3 मि.मी., कराड तालुक्यात 90.1 मि.मी., कोरेगाव तालुक्यात 76.5 मि.मी., खंडाळा तालुक्यात 111.3 मि.मी., तर महाबळेश्वर तालुक्यात 492.7 मि.मी. इतकी अतिवृष्टी झाली. 16 ते 21 ऑगस्ट या कालावधीत धरण क्षेत्रात कोयना 841 मि.मी., नवजा 1280 मि.मी., महाबळेश्वर 950 मि.मी., धोम 166 मि.मी., धोमबलकवडी 519 मि.मी., कण्हेर 113 मि.मी., उरमोडी 187 मि.मी. आणि तारळी 205 मि.मी. इतका प्रचंड पाऊस झाला. या कालावधीत तासगाव, खेड, पाटण, म्हावशी, हेळवाक, मोरगिरी, चाफळ, येराड, वाठार किरोली, शिंरबे, पसरणी, जावळी, आणेवाडी, बामणोली, महाबळेश्वर, तापोळा, नामज, पाचगणी अशा 18 महसूली मंडळामध्ये 65 मिमी. पेक्षा जास्त पर्जन्यमान झाले. अतिवृष्टीच्या कालावधीत 131 कुटूंबातील 381 नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले होते. यावेळी नजरअंदाजे व प्राथमिक झालेल्या कृषी, रस्ते, पूल, गोठे, पशुधन, सार्वजनिक मालमत्ता विद्यूत वितरण आदींबाबतच्या नुकसानीची माहिती प्रशासनातर्फे सादर करण्यात आली.
No comments