धैर्याच्या शौर्याला सातारकरांची सलामी ' शिवतीर्थावर जंगी स्वागत
सातारा (प्रतिनिधी) - शूर-वीर, क्रांतीविरांच्या साताऱ्यात धैर्या कुलकर्णीच्या रुपात चमकता तारा पुढे येत आहे. अवघ्या १३ वर्षात युरोप, आफ्रिका खंडातील सवार्ेच्च शिखर पादाक्रांत करणारी धैर्या हिच्या शौर्याला समस्त सातारकरांनी पोवईनाक्यावरील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सलामीच दिली. पावसाच्या धारांसोबत या 'अजिंक्यकन्या'वर सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युरोप खंडातील सर्वात उंच शिखर माऊंट एलब्रुस सर करत येथील धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने आणखी एक रेकॉर्ड केले. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टचा बेस कॅम्प (१७ हजार ५९८ फूट) सर केला. त्यानंतर लगेच तिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमांजारो शिखर (१९ हजार ३४१ फूट) सर केले. तद्नंतर दि. १४ ऑगस्ट रोजी तिने युरोप खंडातील माऊंट एलब्रुस (१८ हजार ५१० फूट) हे शिखर सर केले. वयाच्या अवघ्या १३ वर्षांत तीन खंडातील तीन शिखरे सर करणारी, तीही पालक सोबत नसतानाही ही कामगिरी करणारी धैर्या भारतातील पहिली मुलगी ठरली आहे.
धैर्याचे शनिवारी सायंकाळी येथील शिवतीर्थावर जनता सहकारी बँक, मावळा फौंडेशन, दि गुजराथी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, गुरुकूल स्कूल व समस्त सातारकरांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. प्रत्येकाच्या मनात जणू आपल्या मुलीनेच ही कामगिरी केली असल्याचा अभिमान होता. सातारकरांच्या उत्स्फूर्त स्वागतामुळे धैर्या आणि तिचे आई-वडिल भारावून गेले. स्वागतानंतर धैर्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
गुरकुल स्कूलचे प्रमुख राजेंद्र चोरगे म्हणाले, गुरुकुल स्कूलची ही मुलगी अष्टपैलू आहे. तिला अनेक गोष्ट 'गॉड्स गिफ्ट' मिळाल्या आहेत. तिच्या छंदाला पाठिंबा देणाऱ्या आई-वडिलांचेही कौतुक करणे गरजेचे आहे.
भाजपचे पदाधिकारी सुनील काटकर म्हणाले, विनोद कुलकर्णी यांना आता धैर्याचे वडील अशी ओळख जास्त आवडेल. धैर्याने सातारकरांची, महाराष्ट्राची मान उंचावण्याचे काम केले आहे. तिच्या या कामगिरीला श्रीमंत छ. खा. उदयनराजे भोसले, श्रीमंत छ. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप व सातारकरांच्यावतीने शुभेच्छा देतो.
पत्रकार अधिस्विकृती समिती पुण्याचे अध्यक्ष हरीश पाटणे म्हणाले, धैर्याने मिळवलेल्या यशाचा सर्वांना अभिमान आहे. तिच्या या कामगिरीने जागतिक कीर्तीमान निर्माण झाला असून, आमच्या मित्रपरिवारासाठी अभिमानाचा, आनंदाचा क्षण आहे. हे यश मिळवण्यासाठी तिने मेहनत केली असून, तिने अभ्यास, वक्तृत्व यामध्येही यश मिळवले आहे. तिच्या आई-वडिलांसाठीही ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांनी केलेल्या त्यागाचे त्यांना फळ मिळाले आहे.
शंकर माळवदे म्हणाले, धैर्याच्या कामगिरीचे कौतुक करणे गरजेचे आहे. तिने केलेली कामगिरी ही अनन्यसाधारण आहे. अशा प्रकारच्या मोहिमेमध्ये पाऊलागणिक धोका असतो. परंतु, तिने नावाप्रमाणे धैर्य दाखवत हे यश मिळवले हे अभिमानास्पद आहे.
जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांनी धैर्याच्या कामगिरीचे कौतुक करत तिचा लहानपणापासूनचा प्रवास सांगितला. केवळ ट्रेकिंगच नाही तर धुर्नविद्या, बुध्दीबळ या विविध खेळांबरोबरच अभ्यासातही तिने प्राविण्य मिळवलेले आहे.
सत्काराला उत्तर देताना धैर्याने प्रारंभी शिवगर्जना केली. ती म्हणाली, माझ्या यशात आई-वडील, बहिण, प्रशिक्षक कैलास बागल यांचा सिंहाचा वाटा आहे. राजेंद्र चोरगे, मार्गदर्शक प्रियंका मोहिते आणि सर्वाच्या आशीर्वादाने मी ही कामगिरी करु शकले.
धैर्याने या प्रवासांची सुरुवात कशी झाली, माझ्यातील छंद आई-वडिलांना कसा ओळखला, त्याला पाठिंबा कसा दिला, शिखर पादांक्रांत करताना कोणत्या अडचणी आल्या, त्याला कसे तोंड दिले याबद्दल सांगितले.
यावेळी तिचे वडील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, आई, शिक्षिका ज्योती कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, जनता बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, शंकर माळवदे, माजी नगरसेवक विजय बडेकर, शकिल बागवान, जनता बँकेचे संचालक ॲड. चंद्रकांत बेबले, सीईओ अनिल जठार, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. आदिती घोरपडे, अमर बेंद्रे, शिवानी कळसकर, प्रीतम कळसकर, शिवराज टोणपे, विश्वनाथ फरांदे यांच्यासह सातारकर उपस्थित होते.
No comments