Breaking News

महु-हातगेघर धरणग्रस्त व लाभ धारकांच्या आंदोलनाबाबत सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Statement to Satara District Magistrate regarding the agitation of Mhow-Hatgeghar dam affected and beneficiary holders

    सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ ऑगस्ट २०२५ - छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील बहु चर्चित महू हातगेघर धरणाच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शेतकरी कृती समितीने आंदोलनाची भूमिका जाहीर केले आहे. याबाबत सातारचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातच महु – हातगेघर धरणग्रस्त व लाभधारक शेतकरी कृती समितीच्या वतीने धरणग्रस्त देते वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानेश्वर रांजणे, युवा नेते सौरभ शिंदे व जावळी शेती उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन जयदीप शिंदे यांच्यासह मान्यवरांनी मान्यवरांनी भेट घेऊन निवेदन दिले.

    यावेळी पर्यटन व माजी सैनिक कल्याण विभाग मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्यासह विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

    जावळी तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणीच्या पायथ्याशी महु – हातगेघर धरण शंभर टक्के पुर्ण झाले आहे . या धरणामध्ये गेली तीन ते चार वर्षापासुन पाणीसाठा केला जात आहे. तसेच या धरणाच्या दोन्ही बाजुंनी पाणी वितरीकांचे काम ९५ टक्के पुर्ण झालेले आहे. परंतु उर्वरीत राहिलेली किरकोळ कामे बंद झालेली आहेत. राज्यातील व कृष्णाखोऱ्यातील इतर धरणांची कामे पुर्ण झालेली आहेत, परंतु महु – हातगेघर धरणाचे काम पुर्ण झालेले नाही. गेली अनेक वर्षे किरकोळ समस्यांमुळे या विभागातील शेतकऱ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी धरणात साठले असून सुद्धा  आजतागायत शेतात कॅनॉलचे पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड धशाला... अशी परिस्थिती या विभागातील शेतकऱ्यांची झालेली आहे.तरी आमच्या विविध मागण्यांसाठी महु – हातगेघर धरणग्रस्त व लाभधारक कृती समिती बुधवार दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ पासुन करहर येथे विठ्ठल रुक्मिनी मंदीर परिसरामध्ये साखळी उपोषण, दरे फाटा येथे रास्ता रोको व कुडाळ येथे आक्रोश मार्चे काढणार आहे. गुरुवार दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ रोजी सायगाव येथे सकाळी आक्रोश मोर्चा दुपारी २ वाजता करहर येथे निषेध सभा,जन आंदोलन, साखळी उपोषण करणार आहे. शुक्रवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ रोजी अन्न त्याग करुन आमरण उपोषण, भजन, पथनाट्याद्वारे भव्य आंदोलन करणार आहोत. शनिवार ६ सप्टेंबर २०२५ रोजी गावोगावचे गणपती विसर्जनावेळी महु हातगेघर धरणामध्ये तसेच या धरण क्षेत्रात येणाऱ्या ४१ गावातील लाभधारक शेतकरी तलाव, नद्या या मध्ये उड्या मारुन जलसमाधी घेणार आहेत. याची नोंद घ्यावी. असे निवेदनात नमूद केले आहे.

    महू हातगेघर धरणग्रस्तांच्या लढ्यासाठी आम्ही सज्ज असून आमची जलसमाधी आंदोलन होणारच आहे. असे धरणग्रस्त नेते वसंतराव मानकुमरे यांनी ठणकावून सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर रांजणे, सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, संदीप परामणे, विकास धोंडे, राजू गोळे, प्रमोद शिंदे, सुरेश गोळे, संजय शिंदे, रवींद्र जगताप यांच्यासह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments