फलटणमधील ‘खड्ड्यांचे विघ्न’ दूर करा; प्रितसिंह खानविलकर यांचे मुख्याधिकार्यांना निवेदन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२५ ऑगस्ट २०२५ - आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून ‘खड्ड्यांचे विघ्न’ दूर करा, अशी मागणी राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखील मोरे यांना निवेदनाद्वारे केली आहे. सदर मागणीचे निवेदन देतेवेळी प्रितसिंह खानविलकर यांच्यासमवेत सामाजिक कार्यकर्ते अजय शिंदे उपस्थित होते.
सदर निवेदनात प्रितसिंह खानविलकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे की, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाच्यावर्षीही दिनांक 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान फलटण शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या गणेशोत्सवात फलटण शहरासह तालुक्यातील गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या कालावधीत शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती, सजावट देखावे पाहण्यासाठी हजारो भाविक फलटण शहरात येत असतात. सध्या शहरातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत असून अनेक ठिकाणी निकृष्ठ दर्जाची कामे झाल्याने रस्त्यात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे.’’
‘‘गणेशोत्सवादरम्यान भाविकांना, गणेश मंडळांना आणि नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये म्हणून रस्त्यातील खड्डे त्वरित बुजवावेत आणि विघ्नहर्ता गणेशाच्या उत्वसात फलटणमधील ‘खड्ड्यांचे विघ्न’ दूर करावे अशी सर्व गणेश भक्तांच्यावतीने विनंती आहे’’, असेही प्रितसिंह खानविलकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
No comments