फलटण मध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचा निष्क्रिय कारभार ; ठेकेदाराच्या गराड्यात अधिकारी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - फलटण तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निष्क्रिय कारभारामुळे अपघातात वाढ होत चालली असून, वरिष्ठ अधिकारी वर्गांचे पूर्णतः जनतेच्या सुरक्षेतेकडे दुर्लक्ष होत आहे. एक अधिकारी जनतेपेक्षा ठेकेदाराच्या गराड्यातच जास्त दिसत आहे. जर एखादा अपघात झाल्यास त्याला संबंधित अधिकारी वर्गाला जवाबदार धरण्याची मागणी जनतेतून होत आहे.
फलटण तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्याचा मनमानी कारभार सुरू असल्याने, एक ना धड भराभर चिंध्या अशी अवस्था रस्त्यांची झालेली आहे. मोठमोठे डंपर रस्त्यावरून शहरातून गल्लीबोळातून दिवसाही फिरत आहेत. अनेक डंपरवर नंबरच नाहीत, हे डंपर कसेही वेगाने सुरक्षिततेची परवा न करता पळविले जात आहेत, त्यामुळे किरकोळ अपघातात वाढ होत चाललेली आहे.
फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची विकास कामे सुरू आहेत, यातील काही कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला असून, रस्त्याच्या दर्जेदार कामाकडे लक्ष न देता ठेकेदारांना रात्री अपरात्री बोलवून टक्केवारीसाठी त्रास दिला जात आहे.आंब्याच्या झाडासारखे ठेकेदार पैशाचे झाड आहे असा भास संबधित अधिकाऱ्याला होत आहे. दिवस उजाडला की सुट्टी आहे का तेपण न बघता, वसुलीचे प्लॅनिंग केले जातं आहे.
एकतर अगोदरच बरेचसे ठेकेदार अडचणीत आहेत, शासनाकडून अनेकांची बिले थकली आहेत, मात्र या बिलांचा पाठपुरावा करण्याच्या नावाखाली त्यांना टक्केवारी मागून मानसिक त्रास दिला जात आहे. मागील आठवड्यात सांगली जिल्ह्यातील एका ठेकेदाराने बिले निघत नसल्याने आत्महत्या केली होती, त्यामुळे फलटण तालुक्यात त्या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे एखाद्या ठेकेदाराने आत्महत्या केल्यास आश्चर्य वाटू नये.
सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी पूर्णवेळ कधीच बसत नाहीत, साहेब इकडे दौऱ्यावर गेलेत तिकडे मिटींगला गेलेत असे भेटायला आलेल्या लोकांना सांगितले जाते, मात्र नेहमी अधिकारी ठेकदारांच्या गराड्यात अधिक वेळ बसलेले दिसून येतात. एखाद्याने फोन केल्यास, फोन उचलला जातं नाही, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराला जनता पूर्णत: वैतागली असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करून सुद्धा शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. माझ्या पाठीशी याचा हात आहे, त्याचा हात आहे, असे सांगत संबंधित अधिकारी सामान्य जनताच काय पण पत्रकारांना सुद्धा भेटायला वेळ देत नाहीत, फलटणमधील सुरक्षेच्या दृष्टीने काय काय उपाययोजना केली याची माहिती मिळविण्यासाठी पत्रकारांनी भेटण्याचा प्रयत्न केला असता मीटिंगच्या नावाखाली वेळ नसल्याचे कारण देत अधिकाऱ्याने पळ काढला.
No comments