सुवर्ण योजनांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक?
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२२ ऑगस्ट २०२५ - फलटणमध्ये सध्या विविध सराफी व्यवसायिकांकडून सुवर्ण संचय योजना, सुवर्ण भिशी, सुवर्ण लक्ष्मी योजना अशा आकर्षक योजना राबवल्या जात आहेत. या योजनांत सामान्य नागरिकांकडून दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करून वर्षाच्या अखेरीस जमा झालेल्या रकमेइतके सोने देण्याचे आश्वासन दिले जाते. मोठी रक्कम एकाचवेळी उपलब्ध नसल्याने नागरिक या योजनांकडे आकृष्ट होत आहेत.
मात्र वास्तवात ग्राहकांना दिले जाणारे सोने तेवढ्या प्रतीचे नसते, तसेच घडणावळीच्या नावाखाली मनमानी पद्धतीने शुल्क आकारले जाऊन नागरिकांना फसवले जात असल्याचे समोर येत आहे. अनेकांना त्यांच्या मेहनतीच्या पैशांचा योग्य परतावा न मिळाल्याची तक्रारही होत आहे.
त्यामुळे नागरिकांनी अशा सुवर्ण योजनांमध्ये सामील होण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सुवर्णपेढी किंवा सराफ व्यवसायिकाने लोकांकडून पैसे गोळा करण्यासाठी व परतावा देण्यासाठी कायद्यानुसार आवश्यक ती परवानगी घेतली आहे का, याची खात्री करूनच या योजनांमध्ये पैसे जमा करावेत, तसेच नागरिकांनी मिळणारे सोने शुद्धतेची खात्री करूनच स्वीकारावे, अन्यथा हातोहात लुबाडले जाण्याचा धोका कायम असल्याचे जाणकारांचे मत आहे.
योजनेचे स्वरूप
◆प्रत्येक महिन्याला नागरिकांनी सराफाकडे ठराविक हप्त्याने पैसे जमा करायचे.
◆१२ महिने किंवा ठराविक कालावधी संपल्यानंतर त्या जमा झालेल्या रकमेइतके सोने ग्राहकाला मिळते.
◆काही योजनांमध्ये सराफ १ हप्ता मोफत किंवा सोन्यावर सवलत देण्याचे आश्वासन देतो.
फसवणुकीचे प्रकार
◆कमी दर्जाचे किंवा कमी शुद्धतेचे सोने देण्यात येते.
◆घडणावळ, वेस्टेज किंवा मेकिंग चार्जेसच्या नावाखाली अतिरिक्त मनमानी शुल्क आकारले जाते.
◆काही ठिकाणी बिल न देता व्यवहार केला जात असल्याने ग्राहकाला योग्य हमी मिळत नाही.
No comments