लाखो मराठे निघणार 28 ऑगस्ट रोजी मुंबईला, फलटण तालुक्यात दिला चलो मुंबईचा नारा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२१ ऑगस्ट २०२५ - संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी आरक्षणाची लढाई तीव्र केली असून त्या अनुषंगाने चलो मुंबईचा नारा देत संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटला आहे.उपोषणास पाठिंबा देण्यासाठी फलटण तालुक्यातून हजारो युवक दिनांक 28 रोजी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने देण्यात आली,त्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चा फलटणच्यावतीने जनजागृती करण्यासाठी फलटण शहराच्या चारी बाजूंनी चलो मुंबईचा नारा देत मोठ मोठे होर्डिंग उभारले असून सातारा जिल्हा मराठ्यांची राजधानी असल्याने व छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी असलेल्या फलटण मधून चलो मुंबईचा नारा घराघरात पोहोचवण्यात मराठा क्रांती मोर्चाला यश आले आहे.
नुकतेच संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी फलटण येथील सजाई गार्डन येथे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना कानमंत्र दिला होता,आता फलटण तालुक्यात एकच आवाज घुमला आहे की "चलो मुंबई, चलो मुंबई, चलो मुंबई" दरम्यान या अनुषंगाने फलटण शहर व तालुक्यातील हजारो मराठा युवक प्रत्येक घराघरातून आपली मोटर सायकल कार ट्रॅक्टर ट्रॉली टेम्पो ट्रक व इतर वाहनांनी दिनांक 28 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मुंबईच्या दिशेने मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत.
प्रत्येक घराघरातील मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून, आता नाही तर कधीच नाही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही अन् कोणत्याही परिस्थितीत माघार नाही या भावनेतून हजारो युवक मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानाकडे कुच करणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधव मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईला जाणारा असून या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील हजारो गावातून लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी प्रत्येक घराघरात गावागावात जनजागृती करीत असून मुंबईकडे जाण्यासाठी मोठ्या तयारीत आहेत, हजारो वाहने मुंबईच्या दिशेने नेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक अगदी बारीक बारीक गोष्टी लोकांना समजावून सांगत आहेत की आपल्याला यावच लागतंय,दादांनी आपल्याला बोलवलंय यामुळे पश्चिम महाराष्ट्रात असलेला कोट्यवधी मराठा आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईकडे जाण्याची जोरदार तयारी करीत आहे.
No comments