Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या प्रदान

Chief Minister Devendra Fadnavis hands over the keys of the flats to the beneficiaries

    कोल्हापूर दि. १७: जुना बुधवार पेठ येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत ‘राजर्षी शाहू महाराज पोलीस संकुल’ या नावाने उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या नुतन निवासी इमारतीतील काही सदनिकांच्या प्रतिकात्मक चाव्या संबंधित लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आल्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सदनिकांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच या सदनिका दर्जेदार झाल्याचे गौरवोद्गार काढले.

    यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, राजेंद्र यड्रावकर, अमल महाडिक, शिवाजी पाटील, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी उपस्थित होते.

    यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कुरुंदवाड येथे उभारण्यात येणाऱ्या नुतन इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या इमारतीच्या उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या वास्तुविशारद, बांधकाम कंत्राटदार यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

    कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयींनी युक्त अशी 168 शासकीय निवासस्थाने बांधण्याकरिता शासनाकडून सुमारे 34 कोटी 62 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रास्ताविकात दिली. या बांधकामाकरिता महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित (मुंबई) यांच्यामार्फत या कॅम्पसमध्ये एकूण A,B,C अशा सात मजली तीन इमारती उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये प्रत्येकी 538 चौ फूट क्षेत्राचे टू बीएचके 56 फ्लॅट असे एकूण 168 फ्लॅट बांधण्यात आलेले आहेत, या ठिकाणी लिफ्टची सोय, गार्डन एरिया, तसेच प्रशस्त पार्किंग, मुलांसाठी प्लेग्राउंड, ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, सोलर सिस्टिम अग्निशामक, मंदिर, एसटीपी प्लांट अशा सोयीयुक्त तसेच 24 तास संरक्षणाचे काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांकरिता विसाव्यासाठी सुंदर कॅम्पसची निर्मिती करण्यात आली आहे. या पोलीस संकुलाला, ‘ राजर्षी छत्रपती शाहू महाराज ‘ पोलीस संकुल असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पोलीस विभागातील इतर अधिकारी – कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी पोलीस निरिक्षक महेश इंगळे – श्रीराम कन्हेरकर , पोलीस हवालदार तानाजी शेंडगे, महिला पोलीस संगिता वराळे, लिपीक विष्णू परीट यांना प्रातिनिधीक स्वरुपात चाव्या देण्यात आल्या.

No comments