पालकत्वाची नवी परीक्षा : मोबाईलच्या दुनियेत मुलांना सावरताना
आजच्या डिजिटल युगात लहान मुलांमध्ये मोबाईल, टॅबलेट आणि टीव्हीचा वापर झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या "स्क्रीन टाइम" मुळे अनेक मानसिक व शारीरिक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे पालक म्हणून आपण सजग राहणं आणि योग्य दिशा देणं ही काळाची गरज बनली आहे.
फक्त “स्क्रीन टाइम कमी करा” असं म्हणणं पुरेसं ठरत नाही. कारण लहान मुलं अतिशय बारकाईने निरीक्षण करतात आणि वडीलधाऱ्यांचं वर्तन नकळत आत्मसात करतात. जर आपणच सतत मोबाईल वापरत असू, तर त्यांना वाटतं – "आई-बाबांना चालतं, मग आपल्यालाही काही हरकत नाही." म्हणूनच, ज्या बदलाची आपण मुलांकडून अपेक्षा करतो, तो बदल आपल्यापासून सुरू होणं आवश्यक आहे.
शाळेत मुले ४ ते ६ तासच असतात. शाळा मूलभूत सवयी घडवते, पण त्या पक्क्या करण्यासाठी घरातील वातावरण अत्यंत महत्त्वाचं ठरतं. जर शाळा आणि घर यांच्यात समन्वय नसेल, तर मुलं गोंधळतात आणि शाळेतील शिक्षणाचा परिणाम कमी होतो. म्हणूनच शाळा आणि घर यांची जबाबदारी समान आहे – हे दोघं मिळूनच खरा आणि सकारात्मक बदल घडवू शकतात.
मुलांना मोबाईलऐवजी कशात गुंतवायचं?
मुलांना गुंतवणं म्हणजे त्यांना फक्त काहीतरी दाखवून शांत ठेवणं नव्हे. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खालील गोष्टी उपयुक्त ठरतात:
त्यांच्यासोबत वेळ घालवा, संवाद साधा, मैदानी खेळ, चित्रकला, हस्तकला यासारख्या क्रियाशील अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी करा. पुस्तकं वाचून दाखवा किंवा गोष्टी सांगा, त्यांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करा आणि त्यांच्या उत्तरांना महत्त्व द्या
मोबाईलचा अतीवापर मुलांच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम करतो. ते पटकन विचलित होतात, एका गोष्टीत लक्ष लागणं कठीण जातं आणि अभ्यासात अडथळा निर्माण होतो.
खूप पालक आज मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना मैदानी खेळांपासून दूर ठेवतात. पण खेळणं, पडणं, उठणं – हेच त्यांच्या अनुभवातून शिकण्याचा (experiential learning) भाग आहे. चुकून शिकायला दिलं पाहिजे, तेव्हाच खरा विकास होतो.
एक अनुभव…
मी एका NGO मध्ये काम करत असताना एका पालकांचा अनुभव ऐकला. त्यांचा मुलगा लहानपणापासून मोबाईलशिवाय झोपू शकत नसे. तो उशाखाली मोबाईल ठेवून झोपायचा आणि रात्री मध्ये उठून त्यावर व्हिडिओ पाहायचा. सुरुवातीला पालकांना त्याचं कौतुक वाटायचं – “किती हुशार आहे आपला मुलगा!” पण जसजसा तो मोठा झाला, तसतसे या सवयीचे दुष्परिणाम दिसू लागले. त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, चिडचिड वाढली होती आणि त्याच्या झोपेच्या सवयी बिघडल्या होत्या. पालकांचा संघर्ष वाढला आणि मग त्यांना या सवयीचे गांभीर्य लक्षात आलं.
मुलांच्या संगोपनात तणावमुक्तता, संवाद, आणि क्रियाशील वेळ याला फार महत्त्व आहे. संतुलित दिनचर्या आणि योग्य मार्गदर्शनाने आपण मुलांचा मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास साधू शकतो. त्यासाठी पालकांनी सजग आणि सक्रिय भूमिका घ्यावी लागते.
आजच सुरुवात करूया आपल्यापासून!
No comments