Breaking News

फलटण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात

Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar Jayanti celebrations at Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५  - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती  मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले होते.   सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची व विचारांची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. शोभा यात्रेत विविध चित्ररथामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या  आकर्षक प्रतीकृती व देखावे केल्यामुळे नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. शोभायात्रेचा शुभारंभ माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा शुभारंभ करताना खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर समवेत धनंजय साळुंखे पाटील, रणजीतसिंह भोसले, अभिजित नाईक निंबाळकर, सुधीर अहिवळे, सचिन अहिवळे

    गुरूवार दि. १३ रोजी रात्री ११ वाजता बौद्ध बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनतर त्रिसरण पंचशील ग्रहण करून, रात्री १२ वाजता आंबेडकरी नूतन वर्षाचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. याप्रसंगी युवक व युवतींनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व विचार याबाबत मनोगते व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा शुभारंभ करताना श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, समवेत विकी काकडे, जय रणदिवे, भाऊ कापसे

    रविवार दि. १४ रोजी सकाळी ८ वाजता  जिंती नाका फलटण येथे भिमज्योतीचे स्वागत पोलीस निरीक्षक शहा यांनी केले. यावेळी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून भीमज्योत नेत असताना ठिकठिकाणी भीमज्योतीचे स्वागत करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रमोद निंबाळकर, राहुल निंबाळकर,सुनील सस्ते, संजय डोईफोडे

    महाराष्ट्र खो - खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस, तहसीलदार अभिजित जाधव, पोलीस निरीक्षक शहा,  पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले. फलटण शहर व तालुक्यातील विविध सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था वगैरे ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.  

    पंचशील रिक्षा ऑटो संघटनेच्या वतीने विठ्ठल मंदिर येथे रक्तदान शिबिर व अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. भीम नगर, मंगळवार पेठ फलटण येथील मित्र मंडळानेही अन्नदान व अभिवादन कार्यक्रमाच्या आयोजन केले होते.   सोमवार पेठ फलटण, येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) फलटण आगार व कामगार संघटना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा ऑटो संघटनेच्यावतीने बसस्थानकावर मान्यवरांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकी दरम्यान क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सव मंडळाच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले. 

    रविवार दि. १४ रोजी रात्री ८ वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ येथून  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा व चित्ररथासह शहर व तालुक्यातील ग्रामस्थांच्या सहभागाने आकर्षक विद्युत रोषणाई व सजावटीत प्रचंड मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी मिरवणूकीचा शुभारंभ खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.  याप्रसंगी धनंजयदादा साळुंखे- पाटील,रणजित भोसले, अभिजित नाईक निंबाळकर, अमोल सस्ते, भाऊ कापसे व पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने पोलीस प्रशासन, ट्रक्टर चालक, झांजपथक, लाईट डेकोरेशन, साउंड सिस्टिम व जयंती महोत्सवास ज्यांची मदत झाली त्यासर्वांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानण्यात आले. यावेळी पोलीस यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते. 

No comments