Breaking News

पक्षासाठी एकनिष्ठ काम करत असतानाही डावलले जात आहे - राजाभाऊ निकम

NCP Sharad Pawar's displeasure in the Phaltan group

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. ३० नोव्हेंबर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा फलटण मध्ये दि. १ डिसेंबर रोजी जेष्ठ नेते सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार फलटण गटामध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम हे २००४ सालापासून पक्ष संघटनेचे काम करत आहेत, त्यांनी विविध पदावर काम केले आहे,  २०१६ साल पासून राज्यावर पक्ष संघटनेचे काम सुरू आहे, पक्षासाठी एकनिष्ठ काम करत असतानाही डावलले जात असल्याची खंत  राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम यांनी व्यक्त केली.

    राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ निकम यांनी नुकतीच पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी राजाभाऊ निकम बोलत होते.

    यावेळी बोलताना निकम म्हणाले की, फलटण तालुक्यासह सातारा  जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी आपण कार्यरत राहिलो आहे. राष्ट्रवादीचे सुप्रीमो खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्ह्याचे नेते बाळासाहेब पाटील व शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फलटण तालुक्यात पक्षवाढीसाठी विविध धोरणे आखली आहेत. परंतु जर पक्षातील जेष्ठ नेते जर विश्वासात घेत नसतील तर नक्कीच वेगळा विचार करावा लागेल.

    जेष्ठ नेत्यांच्या बाबत आपण जिल्ह्याचे नेते बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना माहिती दिली आहे. आगामी काळामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जिल्ह्याचे नेते शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा करूनच आगामी निर्णय घेणार आहे; असेही यावेळी निकम यांनी स्पष्ट केले.

No comments