मॅार्फ व्हिडिओ प्रकरणी सूत्रधारास अटक ; अमर साबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधीजी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणीजी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, यांचे मॅार्फ केलेले आपत्तीजनक व्हिडिओ युट्युब वर प्रसारीत करण्यात आल्याची तक्रार माजी राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनर यांच्याकडे केल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी सदर प्रकरणाचा सायबर सेल मार्फत सखोल तपास करून, या मॅार्फ व्हिडियोचा सूत्रधार असलेला शमीम जावेद अन्सारी यास रांची येथून अटक केली आहे.
या संदर्भामध्ये युट्युब वर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, सोनिया गांधी जी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणीजी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांचे मॅार्फ केलेले अश्लील व्हिडिओ हजारोंच्या संख्येने युट्युब वरून प्रसारीत होत असल्याचे, त्या युट्युब लिंक्सच्या पुराव्यासह श्री अमर साबळे यांनी तक्रार दाखल केली होती.
अमर साबळे यांनी प्रधानमंत्री कार्यालय, केंद्रीय आय.टी मिनिस्टर अश्विनी वैष्णव, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून यासंदर्भात निवेदन दिले होते.
ओटीटी प्लॅटफॉर्म, युट्युब तसेच सोशल मिडियाच्या विविध प्लटफॅार्म्स वर प्रसारित होणाऱ्या माहितीवर सध्या गव्हर्मेंटचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे कोणाच्याही संदर्भात अश्लील, बदनामकारक माहिती सर्रास प्रसारित होणे हे देशामध्ये स्वैराचार आणि अराजकतेला निमंत्रण देणारे आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र शासनाने योग्य तो अॅक्ट पास करावा अशी मागणी अमर साबळे यांनी केली आहे.
दरम्यान या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर काहीच दिवसांमध्ये अमर साबळे यांचे फेसबुक अकाऊंट आणि पेज हॅक झाले असून याची तक्रार त्यांनी पिंपरी चिंचवड सायबर सेलकडे केली असून या हॅकर्सचाही शोध घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या सर्व घटनेमुळे सोशल मिडिया आणि सायबर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
No comments