फलटण येथील प्रसिद्ध घोड्याची यात्रा दि. ११ एप्रिल रोजी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ - महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी व चक्रपाणी महाराजांची जन्मभूमी असलेल्या फलटण नगरीतील महानुभाव पंथीयांची प्रसिध्द घोड्याची यात्रा सुरु असुन मंगळवार दि. ११ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस आहे.
महानुभाव पंथीयांची येथे आबासाहेब, बाबासाहेब, जन्मस्थान, रंगशीळा अशी ४ प्रमुख मंदिरे असून त्याशिवाय शहरात शिंपी गल्ली, रविवार पेठ, महतपुरा पेठ यासह अन्य ठिकाणी या पंथीयांची अनेक मंदिरे व मठ आहेत.
महानुभाव पंथीयांची येथे आबासाहेब, बाबासाहेब, जन्मस्थान, रंगशीळा अशी चार प्रमुख मंदिरे असून त्याशिवाय शहरात शिंपी गल्ली, रविवार पेठ, महतपुरा पेठ यासह अन्य ठिकाणी या पंथीयांची अनेक मंदिरे व मठ आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागासह परप्रांतातूनही महानुभाव पंथीय उपदेशी व अन्य भाविक येथे मोठ्या संख्येने यात्रेसाठी येतात. ६ एप्रिल पासुन या यात्रेस सुरुवात झाली असुन या कालावधीत दररोज सायंकाळी महाआरती झाल्यानंतर सात वाजता श्रीकृष्ण मंदिरातून छबिना वाद्यांचा गजरात रात्री दहा पर्यंत श्रीमंत आबासाहेब मंदिरात पोहचतो व तेथील महाआरती संपन्न होते. यंदा यात्रेचा मुख्य दिवस हा ११ एप्रिल रोजी आहे. या दिवशी दुपारी आबासाहेब मंदिरातील आरती संपल्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती पालखीत विराजमान करण्यात येते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महास्थानाचे पालखीचे पूजन होते. यानंतर मान्यवर्यांच्या हस्ते पूजन होवून पालखी व यात्रेस सुरुवात होते. या यात्रेत मानकर्यांच्या खांद्यावर पितळी घोडे त्या पाठिमागे पालखी व अन्य मानकरी असतात हा सोहळा आबासाहेब मंदिरापासून दगडी पूल मार्गे श्रीकृष्ण मंदिरात (बाबासाहेब मंदिर) पोहोचतो. तेथून चावडी चौक, बारस्कर चौक, महादेव मंदिर मार्गे बाणगंगा नदीतून पितळी घोडे पाणी पिण्यासाठी मानकरी नदीपर्यंत पळत घेवून जातात या पध्दतीने बाणगंगा नदीतून बारवबाग, मलठण, दत्त मंदिर, शुक्रवार पेठेतून पालखी श्रीकृष्ण मंदिर (बाबासाहेब मंदीर) आणि पुन्हा आबासाहेब मंदिरात पोहोचल्यानंतर पालखी सोहळा समाप्त होतो.
घोड्याची यात्रा पहाण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात या कालावधीत व्याख्यानमाला, व्यसनमुक्ती, प्रबोधन, कीर्तनाच्या माध्यमातुन समाज प्रबोधन व लहानमुलांचे शिबीर,अन्नछत्रच्या माध्यमातून अन्नदान असे नानाविध उपक्रम श्री कृष्ण देवस्थान ट्रस्ट तर्फे तसेच फलटण येथील स्थानिक सर्व संत महंतांच्या उपस्थितीत संपन्न होत असतात. या यात्रेत महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, कर्नाटक आदी राज्यातून हजारो भाविक सहभागी होतात.
No comments