Breaking News

रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष मोहीम

Special campaign of Sub-Regional Transport Office to reduce road accidents

    सातारा  :- गतवर्षाच्या तुलनेत सातारा जिल्ह्यात अपघात व अपघाती मृत्यूमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. या आकडेवारीचे विश्लेषण करून त्यावर कोणत्या उपाययोजना करता येतील याविषयी निर्देश प्राप्त झाले आहेत. परिवहन आयुक्तांनी अपघात व त्यावरती करावयाच्या उपाययोजनांबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विशेष मोहिम राबवण्यात आली. यापुढेही ही मोहिम नियमितपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.

    अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दि. 1 मार्च 2023 ते 15 मार्च 2023 दरम्यान राष्ट्रीय महामार्ग व इतर महामार्गावर तपासणी मोहिम राबिवण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 2 हजार 91 दोषी वाहनांवर केलेल्या कारवाईमध्ये 12 लाख 66 हजार 750 रुपये इतका प्रत्यक्ष दंड वसूल झाला आहे.

    या कारवाईची माहिती पुढीलप्रमाणे. नियमांचे उल्लंघन व कारवाईची संख्या यांची माहिती अनुक्रमे देण्यात आली आहे. हेल्मेट – 754, वाहन चालवताना मोबाईलचा वापर – 213, अती वेगाने चालणारी वाहने – 490, सिटबेल्ट – 215, चुकीच्या लेनमधून चालणारी वाहने – 32, धोकादायक पार्किंग – 169, ट्रिपल सिट – 55, विमा नसलेली वाहने – 138, पी.यु.सी नसलेली वाहने – 63, योग्यता प्रमाणपत्र नुतणीकरण नसलेली वाहने – 65, रिफ्लेक्टर/ टेल लॅम्प – 20, एकूण प्रकरणे – 2091.

    अपघातांची विशेषतः प्राणांतिक अपघातांची संख्या कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामध्ये तालुकानिहाय विशेष पथकामार्फत अपघाताची तीव्रता जास्त असलेल्या ठिकाणी हेल्मेट, सिटबेल्ट, अतिवेग, रॅश ड्रायव्हिंग, इ. गुन्ह्यांसाठी वाहन तपसणी करुन दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली. खंडाळा येथे राष्ट्रीय महामार्गावर खाजगी, इतर बसेस व प्रवासी वाहने बेकायदशीरपणे थांबा घेऊन प्रवाशी चढ उतार करतात. त्यामुळे रस्ता वापरणाऱ्या इतर वाहनांना धोका उत्पन्न होतो. त्यावर खंडाळा येथील स्थायी पथकामार्फत कारवाई करण्यात आली. आनेवाडी टोल नाका स्थायी पथकामार्फत रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट, सिटबेल्ट, अतिवेग, मोबाईल, रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रीय महामार्गावर धोकादायक पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांवर तसेच राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या मार्गिकेमधून चालणाऱ्या वाहनांवर फिरत्या पथकांमार्फत मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.

    याशिवाय जिल्ह्यातील अपघातस्थळी तातडीने भेट देण्यासाठी व अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी दोन फिरत्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदर ठिकाणी पुन्हा अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना राबविणेबाबत संबंधित विभागांना अवगत करण्यात आले आहे. अंमलबजावणी करताना वाहनचालकांकडून पुन्हा तशीच चुक होऊ नये यासाठी आवश्यक ते समुपदेशन ही पथकातील अधिकारी करत आहेत.

    जिल्ह्यात जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांमध्ये अपघाताच्या टक्केवारीत वाढ झाल्याने दुचाकी, चारचाकी व पादचाऱ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने पालन करावे असे अवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे. वाहन चालकांनी पुढील नियमांचे पालन करणे हे त्यांच्या जीविताच्या दृष्टीने आवश्यक आहे. दुचाकी वाहनांच्या अपघाताची टक्केवारी 51 टक्के आहे. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहन धारकाने हेल्मेटचा वापर करावा. चारचाकी वाहनांच्या अपघाताची टक्केवारी 24 टक्के आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चारचाकी वाहन चालकांनी वेगमर्यादेचे पालन करणे व सिटबेल्टचा वापर करणे अनिवार्य आहे. पादचारी अपघाताची टक्केवारी 20 टक्के आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पादचाऱ्यांनी फुटपाथ नसलेल्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजुने चालावे असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले आहे.

    ही मोहिम राबविण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक संदीप भोसले, योगेश ओतारी, मारुतीराव पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दाऊद मुश्रीफ, विनायक सूर्यवंशी, संग्राम देवणे, सुजीत दंडेल, पूजा लोखंडे, श्री. प्रसाद सुरवसे, मोनिका साळुंखे,  शिवदिनी लाड, राजेंद्र दराडे यांनी योगदान दिले.

    रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने यापुढे ही विशेष तपसणी मोहिम नियमितपणे राबविली जाणार असुन त्यासाठी सर्व वाहनधारकांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने मोटर वाहन नियमांचे तंतोतंत पालन करावे व रस्ता सुरक्षा साध्य करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले आहे.

No comments