Breaking News

निधी देताना कोणताही दुजाभाव केला जाणार नाही ; ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावणार - ना. शंभूराज देसाई

बोलताना ना. शंभूराज देसाई, व्यासपिठावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळूंखे-पाटील, चंद्रकांत जाधव, विराज खराडे व अन्य

    No prejudice shall be done in disbursement of funds; The problem of rural hospital will be resolved - Minister Shambhuraj Desai

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ जानेवारी - फलटण तालुक्यात मागील अडीच वर्षात विकासाचा निधी आला नाही असे खा. रणजीतसिंह यांनी सांगितले, पण आम्ही तर समजत होतो की, फलटण आणि कराडलाच सर्व निधी जातोय आणि पाटण, वाई हे सगळं कोरडेच राहतेय, पण मी पालकमंत्री झाल्यापासून निधी वाटप करताना समतोल राखण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्ह्यातील जल संपदाचे काही प्रश्न असतील, पुनर्वसनाचे प्रश्न असतील, पूल - रस्त्याचे प्रश्न असतील याबाबत आम्ही जिल्ह्याचा आराखडा तयार केला आहे, त्याला लागणाऱ्या निधीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या असून, येणाऱ्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात येईल असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. निश्चितपणे त्या दृष्टीने आमचे कामकाज चालू आहे, इथून पुढच्या दोन अडीच वर्षात मी पालकमंत्री असेपर्यंत विकास कामांचा निधी देताना कोणताही दुजाभाव केला जाणार नाही असे आश्वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

ना. शंभूराज देसाई यांचा नागरी सत्कार करताना खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, विराज खराडे, विजय मायणे, सचिन बिडवे  

    फलटण येथे स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या  जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व  राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई  यांचा नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात ना. शंभूराज देसाई बोलत होते. याप्रसंगी  खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, जिल्हा संपर्क प्रमुख शरद कणसे, महिला आघाडीच्या शरदाताई जाधव, प्रल्हादराव साळुंखे पाटील, ऍड.नरसिंग निकम, विश्वासराव भोसले, विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, विराज खराडे, विजय मायणे, सचिन बिडवे, नानासाहेब इवरे तसेच भारतीय जनता पक्षाचे व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

    निरा देवघर प्रकल्पाबाबत बोलताना ना. शंभूराज यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकूण १८ जलसंपदा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत, अशी काम करण्याची पद्धत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची आहे. येणाऱ्या काही दिवसात खा. रणजीतसिंह यांच्या सह आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन, निरादेवघरचा प्रश्न देखील मार्गी लावू असे आश्वासन ना. शंभूराज देसाई यांनी दिले.

    मागील अडीच वर्षात वर्षा बंगल्यावर आमदारांना, खासदार व मंत्र्यांना प्रवेश नव्हता, पण एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून कुठलाही पदाधिकारी वर्षा बंगल्यावर गेला तर मुख्यमंत्र्यांना न भेटता माघारी येत नाही, कितीही उशीर झाला तरी भेट ही होतेच आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाचं समाधान करण्याचे काम मुख्यमंत्री करत असतात, मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक असते, त्यावेळी सुद्धा हजार दोन हजार कार्यकर्ते नागरिक भेटण्यासाठी आलेले असतात, परंतु कितीही वेळ झाला तरी प्रत्येकाची निवेदन स्वीकारली जातात, ही कामाची पद्धत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतोय अशातला भाग नाही, परंतु आपला नेता जर एवढं काम करत असेल तर आपण मंत्र्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कसे काम केले पाहिजे, हे आपण ठरवले पाहिजे, असे सांगतानाच ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला आमदार, मंत्री केलं, तुमच्या पाठीमागे ताकद उभी केली, त्या शिवसैनिकास, पद मिळाल्यावर विसरू नका, त्याला मदत करा, त्याची कामे मार्गी लावा अशी शिकवण  मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आम्हाला आहे.  शिवसैनिकांनी कोणतीही अडचण असेल तर मला हाक द्यावी, त्यांना न्याय देण्याचं काम माझ्याकडून होईल,  शिवसैनिकांच्या  पाठीशी मी ठामपणे उभा असेन अशी ग्वाही ना. शंभूराज देसाई यांनी दिली.

    वीस वर्षापासून झिरपवाडी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न धुळखात पडलेला आहे, रुग्णालयाच्या सर्व इमारती देखील बांधून तयार असून, त्याचेही  नुकसान सुरू आहे, परंतु येथील काही लोकप्रतिनिधींनी ते रुग्णालय खाजगी संस्थेला चालवायला देण्याचा घाट घातलेला आहे, त्यामुळे पालकमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा तसेच नीरा देवघर प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर केली.

    फलटण तालुक्याला गेल्या अडीच वर्षात निधी वाटपात अनुशेष राहिला आहे. आता पालकमंत्री आपण झाला आहात. आता हा अनुशेष भरुन काढा, व आमचे खऱ्या अर्थाने पालकत्व घ्या अशी अपेक्षा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली. येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणूक ही बाळासाहेबांची शिवसेना पक्ष व भारतीय जनता पक्ष हातात हात घालून लढणार असल्याची ग्वाही यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

    प्रारंभी फलटण येथील बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे जनसंपर्क कार्यालय व आरोग्य शिबिराचे उद्घाटन  पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक विराज खराडे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत विजय मायने, सचिन बिडवे व विराज खराडे यांनी केले.

No comments