Breaking News

ना. नितिन गडकरी यांचा फलटण येथे भव्य नागरी सत्कार - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर


Nitin Gadkari's grand civic honor at Phaltan - MP Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २२ : केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून फलटण शहर, तालुका व माढा लोकसभा मतदार संघातील विकास कामे व रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे, त्याबद्दल फलटण येथे शुक्रवार दि. २७ जानेवारी २०२३ रोजी त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

       कोळकी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या फलटण बारामती या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आपण त्यांना गतवर्षी पत्र दिले होते. त्यानुसार जवळपास साडेसातशे कोटींच्या या रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन, तसेच पंचावन्न हजार कोटी रुपयांचा पुणे बेंगलोर महामार्ग फलटण तालुक्यातुन जात आहे, त्याचा संगणीकरणाद्वारे शुभारंभ तसेच दहिवडी ते सांगली या नविन राष्ट्रीय महामार्गाची घोषणा यावेळी होण्याची संभावना असल्याचे सांगुन, खासदार निंबाळकर यांनी सांगितले की, फलटण शहरास आपण बायपास मंजूर करुन घेतला आहे. त्याचे काम अर्ध्यापर्यंत पुर्ण होत आले आहे,  परंतू उर्वरीत बायपासच्या कामासाठी निधीची आवश्यकता असुन, त्याचीही मागणी आपण करणार आहोत, कारण फलटण शहराच्या चारही बाजुने बायपास झाला तर फलटणचा विकासच होणार आहे. त्याचबरोबर फलटण तालुक्यातुन जो नविन पुणे बेंगलोर महामार्ग जाणार आहे, त्या महामार्गास जोडणारा तेहतीस किलोमिटरचा जोड रस्ता फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी येथुन करण्यात यावा, अशी आपली मागणी आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वीच या मार्गाचा हवाई सर्व्हे झाला असुन या रस्त्याची घोषणाही यावेळी केली जाणार आहे. केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून आजवर हजारो कोटींचा निधी विविध रस्ते, महामार्गासाठी मंजूर झाला आहे. त्यामुळे फलटण येथे होणाऱ्या या कार्यक्रमास केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांना दिर्घायुष्य लाभावे व त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीस आशिर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातील जनतेने मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

 पुढच्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाचे आयोजण आपण करणार आहोत, त्यावेळी नीरा-देवघर पाणी प्रश्न, धोम-बलकवडीची आठमाही पाणी योजना, नाईकबोमवाडी ता. फलटण येथील औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ अशा विविध व महत्वपूर्ण घोषणांसह काही लाख कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ होताना आपणास दिसणार असल्याचे खासदार निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments