Breaking News

मुधोजी महाविद्यालयास छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर

Chhatrapati Shivaji Maharaj Vanshree Award announced to Mudhoji College,Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २० : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय, फलटण यांना राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०१९, दि. १७ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे जाहीर झाला आहे. १ लाख रुपये रोख व सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.   

      महाराष्ट्र विधान परिषद माजी सभापती तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर  पर्यावरण विषयक मोहिम विशेषत: मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे सर्वांना प्रवृत्त करण्याची भूमिका घेतली असताना मुधोजी महाविद्यालयाने केलेल्या कामाचे कौतुक करीत शासन स्तरावर या पुरस्काराची घोषणा प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

     मुधोजी महाविद्यालयाने आपल्या २८ एकराच्या परिसरामध्ये ३००० पेक्षा जास्त झाडे लावून संपूर्ण परिसर हरित बनवला आहे, त्याचबरोबरच महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध गावांमध्ये कॅम्पच्या आयोजनातून तसेच राज्यस्तरीय व विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबीरांचे आयोजन करुन वृक्ष लागवड करणे,  जलसंधारणाची कामे करणे व पर्यावरण समतोलासाठी प्रबोधन करणे हे कार्य यशस्वीपणे व सातत्याने केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

   प्रतिवर्षी महाराष्ट्र शासन ६ महसूल विभागांकरिता विभागीय पुरस्कार देत असते, पुणे विभागातून मुधोजी महाविद्यालयास शैक्षणिक संस्था गटातून हा पुरस्कार प्राप्त झाला व त्यानंतर विभागातून आलेल्या संस्थांचा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी समावेश केला जातो, त्यामध्ये सर्व विभागातून राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महाविद्यालयास प्राप्त झाला आहे. वृक्ष लागवडीमध्ये मुधोजी महाविद्यालयाची कामगिरी अतिशय प्रशंसनीय व  प्रेरणादायी ठरली आहे. 

    महाविद्यालयाचे तत्कालीन प्रभारी प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त युनिट म्हणून महाविद्यालयाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविणारे डॉ. सुधीर इंगळे या प्रकल्पाचे जनक आहेत. त्यानी हरित महाविद्यालय ही संकल्पना घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आपल्या महाविद्यालय परिसरामध्ये केली व स्वच्छ महाविद्यालय, हरित महाविद्यालय हा मंत्र देऊन यशस्वी  वाटचाल केली.

     महाविद्यालयाच्या या हरित कामगिरीची दखल वनश्री पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली व हा प्रथम क्रमांकाचा एक लाख रकमेचा पुरस्कार महाविद्यालयास जाहीर झाला आहे. तो दि. १२ डिसेंबर २०२२ पूर्वी महाराष्ट्र शासनाकडून वितरित करण्यात येणार आहे.

      हा पुरस्कार जाहीर झाल्याने फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी महाविद्यालयाच्या या गुणगौरवाबद्दल समाधान व्यक्त करुन राष्ट्रीय सेवा योजना युनिटचे व विशेष करुन अग्रस्थानी असणारे डॉ. सुधीर इंगळे, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी, विद्यार्थी व महाविद्यालयाचा सेवक वर्ग या सर्वांच्या प्रयत्नांचा चांगला परिणाम असल्याचे मत व्यक्त करुन विशेष कौतुक केले आहे. 

      हा वनश्री पुरस्कार म्हणजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा एक सकारात्मक परिणाम असल्याचे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी व्यक्त करताना त्यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीने सातत्याने प्रोत्साहन दिल्याबद्दल आभारही व्यक्त केले.

       मुधोजी महाविद्यालय यापुढेही मौजे जावली, ता. फलटण येथे सुरु असणाऱ्या महत्त्वाकांक्षी पर्यावरण प्रकल्पामध्ये सक्रिय सहभाग घेणार असल्याचे प्रतिपादन डॉ. कदम यांनी केले. तसेच यानिमित्ताने वनविभाग फलटण, विविध स्वयंसेवी संस्था यांचे सौजन्य लाभल्यामुळेच हा प्रकल्प यशस्वी झाला असल्याने त्यांचाही या पुरस्कार मध्ये अप्रत्यक्ष सहभाग राहिलेला आहे.

No comments