Breaking News

मुलांनी ध्येय उद्दिष्टासाठी वाचन संस्कृती जोपासावी - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ; ग्रंथोत्सव-2022 चे शानदार उद्घाटन

Grand Inauguration of Granthotsav-2022, 

    सातारा, दि. 19 : जगात पुस्तकासारखा मित्र नाही. हा मित्र कोणत्याही अपेक्षा ठेवत नसून आपल्याला चांगले जीवन जगण्याबरोबर ध्येय उद्दिष्टासाठी   मदत करतात. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रंथालयांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रंथ संपदा आहे ती मुलांनी वाचून वाचन संस्कृती जोपासावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

    जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा कार्यालयामार्फत शनिवार दि. 19 व रविवार दि.20 नोव्हेंबर 2022 रोजी कवयित्री शांता शेळके नगरी, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल, जुना राजवाडा, गोल बागेसमोर, सातारा येथे  ग्रंथोत्सव- 2022 चे   आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, जिल्हा साहित्य परिषदेचे प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संभाजीराव पाटणे आदी उपस्थित होते.

    थोर पुरुषांनी वेगवेगळ्या विषयांवर ग्रंथांचे लिखाण केले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, मुलांनी आपल्या आई-वडिलांना किंवा शिक्षकांना विचारुन पुस्तके वाचावीत. पुस्तके वाचण्यास सुरुवात केल्यानंतर तुम्हाला कोणते पुस्तके वाचायची आहेत याचेही ज्ञान मिळेल. जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने ग्रंथोत्सव-2022 चे चांगले नियोजन केले आहे. याचाही सातारा वासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.  सबनीस म्हणाले, ज्याच्या घरात ग्रंथ संपदा तो खरा श्रीमंत. ग्रंथ वाचनामुळे सभ्यता, संस्कृती व प्रगल्भता निर्माण होते. समाज जर एकसंघ ठेवायचा असेल तर प्रत्येकाने ग्रंथ वाचले पाहिजे. ऐतिहासिक, सामाजिक, कृषी, सहकार यासह विविध विषयांवरील पुस्तके वाचले तर संशोधकही निर्माण होण्यास मदत होणार आहे. याचा देशाच्या विकासासाठी लाभ होणार आहे.

    ग्रंथ वाचनामुळे सर्वसंपन्न असा माणुस घडतो त्याला समाजाकडे पाहण्याची दृरदृष्टी मिळते. आज वाचन संस्कृती जनत करण्याचे काम ग्रंथालये करीत आहेत. मुलांनी टीव्ही, मोबाईलच्या काळात वाचन संस्कृतीकडे वळले पाहिजे. पुस्तक वाचन तुम्हाला जगण्याचे बळ तर देईल याचबरोबर आपल्यावर चांगले संस्कारही होतील, असेही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.

ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सावाची सुरुवात

    ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. ही ग्रंथदिंडीचे तालीम मैदान संघ ते श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल असे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथदिंडीमध्ये शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांच्यासह विविध शाळेंच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

No comments