Breaking News

सोमंथळी येथे ओढ्याला आलेल्या पुरात इर्टीगा गाडी वाहून गेली ; बाप-लेकीचा दुर्दैवी अंत

At Somanthali, the Ertiga was swept away by a flood in the stream 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. १८ -  मुसळधार पावसामुळे सोमंथळी ता. फलटण येथे ओढ्याला आलेल्या पुरात, पाण्याचा अंदाज न आल्याने  इर्टिका गाडी ओढ्यात वाहून गेली.  यामध्ये बाप-लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  स्थानिक ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढली. या दुर्घटनेत माण तालुक्यातील वारूगड येथील छगन मदने आणि त्यांची १३ वर्षांची मुलगी प्रांजल मदने यांचा मृत्यू झाला आहे.

    घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, छगन मदने हे सोमंथळी ता फलटण येथील त्यांचे सासरे तुकाराम भंडलकर यांना भेटण्यासाठी सोमंथळी येथे रात्री उशिरा येत होते. सोमंथळी - सस्तेवाडी या रस्त्यावर असणार्‍या ओढ्याला काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. पुलावरून पाणी वाहत असल्याने  या पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने वारूगड ता माण येथील छगन मदने (वय३८) व त्याची मुलगी प्रांजल मदने (वय १३)  यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. छगन मदने मिल्ट्रीमध्ये सेवा करीत होते. सुट्टी निमित्ताने ते सासरे तुकाराम भंडलकर यांना भेटण्यासाठी आले होते. पुरात वाहून गेल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी ग्रामस्थ व जेसीबीच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. छगन मदने व त्यांची मुलगी प्रांजल मदने यांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ओढ्यातून गाडी बाहेर काढताना 

No comments